मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 ला हिरवा झेंडा,दहिसर ते आरे मिल्क कॉलनीचे लोकार्पण

 

गुढीपाडव्याला मुंबईकरांना मोठी भेट मिळणार आहे.बहुप्रतिक्षीत मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A या मेट्रो रेल्वेचे आज गुढीपाडव्याच्या दिवशी उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मेट्रो सुरू झाल्यास मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. मात्र मेट्रो मार्गांच्या उद्धाटनाआधीच शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. कारण मुंबई मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही.

पहिल्या टप्प्यामध्ये 20 किलोमीटर मार्गावरील वाहतूक सुरू
मेट्रो 7 आणि 2A या मार्गावर एकत्रिपणे पहिल्या टप्प्यामध्ये 20 किलोमीटर मार्गावरील वाहतूक सुरू होणार आहे. त्यानंतर या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात 15 किमी मार्गावर मेट्रो चालवण्यात येणार आहे. अद्यापही काही मेट्रो स्थानकावरील कामे अपूर्ण आहेत. ही कामे आणि आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो धावणार आहे. मुंबई ‘मेट्रो 7’ च्या तिकिटाचे किमान दर 10 रुपये असणार असून कमाल दर 80 रुपये असणार आहेत.

शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई
मेट्रोच्या उद्घाटनाआधीच श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. भाजपच्या वतीने मुंबईत अनेक ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असून ‘काम केलंय मुंबईने पाहिलंय’ असं लिहिण्यात आलं आहे. भाजप-शिवसेना काळात सुरू झालं होतं मेट्रोच्या कामाला भाजपनं गती दिली आणि अंतीम टप्प्याकडे नेलं असा दावा भाजपकडून करण्यात येतोय.

मेट्रो 2 अ’ मार्ग असा असणार

‘मेट्रो 2 अ’ हा 18.5 किमी लांबीचा आहे. दहिसर पश्चिम ते डीएन नगर स्थानकापर्यंत ‘मेट्रो 2 अ’ मार्ग असणार आहे. या मार्गात दहिसर पूर्व, अप्पर दहिसर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एकसर, बोरिवली (पश्चिम), शिंपोली, कांदिवली (पश्चिम), धनुकरवाडी, वलणई, मालाड (पश्चिम), लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव (पश्चिम), ओशिवरा, लोअर ओशिवरा आणि डीएन नगर अशी स्थानके असणार आहेत.

 

मेट्रो-7 मार्गावर 14 स्थानके असणार आहेत. दहिसर पूर्व, ओवरीपाडा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे , गोरेगाव पूर्व (महानंद डेअरी), जोगेश्वरी पूर्व (जेव्हीएलआर जंक्शन), शंकरवाडी, गुंदवली (अंधेरी पूर्व) या स्थानकांचा समावेश आहे.

Team Global News Marathi: