“मेरी बिल्ली मुझीसी म्याव” मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात शिवसैनिकांचा बहिष्कार

 

अलिबाग | अलिबाग-उसर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित असूनही जिल्ह्यातील आमदारांसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकत पक्षांतर्गद असलेली खदखद अनुपस्थितीतून व्यक्त केली होती यावेळी ठाकरे यांनी मात्र ही मोहीम उघडणाऱ्यांची दखल न घेता पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक करत पक्षातील तिन्ही बंडखोर आमदारांना एकप्रकारे चपराक लगावली.

ज्या कार्यक्रमांना पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे असतील, त्या कार्यक्रमांना जिल्ह्यातील शिवसैनिक जाणार नाहीत, असे अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी आधीच घोषित केले होते. आदिती काेणालाच विश्वासात घेत नाहीत, कामात सातत्याने लुडबुड करतात. त्यामुळे शिवसेनेत असलेली नाराजी काही दिवसांपूर्वी बाहेर पडली. पक्षाचे आमदार महेंद्र दळवी, भरत गाेगावले आणि महेंद्र थाेरवे यांनी पालकमंत्री हटाव मोहीम सुरू केली.

तसेच याच मुद्दयांवर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावर पक्षाने काहीही निर्णय घेतला नसल्याने जिल्हा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजन साेहळ्याला तिन्ही आमदारांसह कार्यकर्त्यांनी दांडी मारत मुख्यमंत्र्यांनाच कोंडीत पकडले.ठाकरे यांनी ऑनलाइन उपस्थित राहात पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या कामाची प्रशंसा केली. काम पूर्णत्वास नेणे ही आदिती तटकरे यांची खासियत आहे. अमुक काम करा, तमुक काम करा असे सर्वच सांगतात; परंतु त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन पार पाडले, अशा शब्दांत स्तुती करत त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना इशाराच दिल्याचे मानले जात आहे.

Team Global News Marathi: