MCA च्या राजकीय फिक्सींगवरुन संतापले ठाकरे, राज्यपालांसह सगळ्यांनाच झापलं

 

मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी अमोल काळे यांची निवड झाली. MCA चा अध्यक्ष कोण होणार, याची साऱ्यांनाच उत्सुकता होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा बड्या नेतेमंडळींचा अध्यक्षपदासाठी अमोल काळे यांना पाठिंबा होता.

त्यामुळे त्यांच्या विरोधात उभे असलेले भारताच्या ‘1983 वर्ल्ड चॅम्पियन’ संघातील माजी खेळाडू संदीप पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. अमोल काळे यांना १८३ मते मिळाली तर संदीप पाटील यांना १५० मते मिळाली. आता, एमसीएसाठी झालेल्या राजकीय महायुतीवर शिवसेना ठाकरे गटाकडून सडकून टीका करण्यात आली आहे. राज्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या संकटात असताना राजकीय स्नेहभोजन, राज्यपालांचे भूमिगत असणे, यावरुन शिवसेनेनं रोखठोक सवाल उपस्थित केले आहेत.

महाराष्ट्रातील दिवाळी शेतकऱ्यांसाठी बरी नाही. सर्वत्र महाप्रलय आहे आणि शेतकऱ्यांची खरीप आणि रब्बी हंगामातील पिके वाहून गेली. शेतकरी अडचणीत आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर होईल. पण आपले सर्वपक्षीय शेतकरी राजकारणी मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीसाठी एकत्र आले व त्यांनी वानखेडे मैदानावर स्नेहभोजन केले. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि शिवसेनेचे लोकंही त्यात सामील झाले. हा ‘स्नेह’ इतर वेळी कुठे अदृश्य होतो? असा सवाल शिवसेनेनं विचारला आहे.

क्रिकेटमध्ये आज प्रचंड पैसा गुंतला आहे व तो एक किफायतशीर उद्योग बनला आहे. मुंबईसह भारतीय क्रिकेट उद्योगांवर आपले नियंत्रण राहावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून चढाओढ सुरू झाली आहे. क्रिकेटपटूंच्या म्हणजे खेळाडूंच्याच हाती क्रीडा संघटनांची सूत्रे राहावीत हा नियम लोढा समितीने केला. तो आता बदलला व संदीप पाटील यांचा पराभव करण्यासाठी सर्व राजकीय पुढारी मतभेद विसरून एकत्र आले. निदान मुख्यमंत्री शिंदे यांनी तरी संदीप पाटील यांची बाजू घ्यायला हवी होती, पण फुटबॉलपासून क्रिकेटपर्यंत सर्वत्र राजकीय नेत्यांचेच खेळ चालतात. हे खरे असले तरी गेल्या काही वर्षांत या क्षेत्रात राजकारणी शिरल्यामुळे बऱ्याच चांगल्या गोष्टीदेखील घडून आल्या.

राजकारणाचाच खेळ व त्यात फिक्सिंग आल्यावर खेळात राजकारण आले म्हणून दोष का द्यायचा? क्रिकेटच्या मैदानावर सर्वपक्षीय राजकीय नेते स्नेहभोजनासाठी येतात. आम्ही खेळात राजकारण आणत नाही, असे जाहीर करतात व त्या मैदानातून खेळाडूंना खड्यासारखे बाहेर काढतात, अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

Team Global News Marathi: