ब्रिटनच्या लॉकडाऊनमध्ये अडकले मराठी सेलिब्रिटी
संपूर्ण देशभरात कोरोनाचे संकट कमी होत असताना ब्रिटनमध्ये नव्या कोरोना व्हायरसने आपले डोके वर काढले आहे. याच पाश्वभूमीवर मुंबई महाराष्ट्रातही ५ जानेवारी २०२१ पर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे.
याच पार्श्वभूमीवर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जोन्सन यांनी कडक लॉकडाऊन जाहीर केला. यामुळे ब्रिटनमधील काही भागात कडक लॉकडाऊन लागू झाला आहे. पण आता ब्रिटनमध्ये आणखीन एक नवा कोरोना व्हायरसचा स्ट्रेन आढळल्याची माहिती ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हॅकाँक यांनी बुधवारी दिली आहे.
यादरम्यान ब्रिटनमधील लॉकडाऊनचा फटका भारतीय कलाकरांना बसला आहे. अनेक बडे सेलिब्रिटी इंग्लंडमध्ये अडकल्याचे समोर येत आहे. यामध्ये मराठी कलाकारांपैकी अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता संतोष जुवेकर इंग्लंडच्या लॉकडाऊनमध्ये अडकल्याचे समजत आहे.
अनलॉक प्रक्रियेनंतर अनेक कलाकार आगामी चित्रपटासाच्या शूटिंग करण्यासाठी इंग्लंडला गेले होते. माहितीनुसार मराठीतील दोन चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये होते. लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘डेट भेट’ आणि समीर जोशी दिग्दर्शित ‘छूमंतर’ या दोन चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये सुरू आहे.
‘छूमंतर’मध्ये रिंकू राजगुरुसोबत प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी, रिषी सक्सेना, ‘नाळ’ चित्रपट फेम बालकलाकार श्रीनिवास पोकळेही तिथे शूटिंग करत आहेत. मात्र ब्रिटनमध्ये लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अडकले आहेत.