मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना खासदार अरविंद सावंतांनी उठवला आवाज 

 

 

नवी दिल्ली | मराठा आणि धनगर आरक्षणासाठी शिवसेनेने सोमवारी लोकसभेत जोरदार आवाज उठवला. देशातील राज्यांमध्ये कोणत्या जाती मागास आहेत, ज्यांना सवलतींची गरज आहे त्याबाबत सर्व राज्यांना पत्र पाठवून माहिती घ्यावी आणि त्यांना आरक्षण देण्याबाबत विधेयक आणावे, अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत केली.

 

 

महाराष्ट्रातील मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. तो शैक्षणिक आणि सामाजिकदृष्टय़ा मागास आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे खासदार सावंत म्हणाले. त्याचप्रमाणे जातीच्या अक्षरात थोडा फरक पडल्याने धनगर समाज सवलतींपासून वंचित राहिला आहे. महाराष्ट्रात त्यांचा उल्लेख ‘धनगर’ असा होतो तर उत्तर हिंदुस्थानात ‘धनगड’ म्हटले जाते असे सावंत यांनी संसदेत मुद्दा मांडला.

 

मात्र या एका अक्षराच्या फरकामुळे त्यांना सवलती मिळत नाहीत. अशाच प्रकारे परीट समाजही मागे राहिला आहे. या सर्व समाजांना सवलती मिळाव्यात यासाठी संबंधित राज्य सरकारांकडून त्यांची माहिती घ्यावी आणि त्यांना सवलती देण्यासाठी विधेयक आणावे असे खासदार सावंत यांनी सभागृहात सांगितले.

Team Global News Marathi: