“मलिक आणि देशमुख यांच्यावर आरोप सिद्ध नाहीत, निकाल आश्चर्यकारक”

 

राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी उद्या शुक्रवारी मतदान होत आहे. पण तत्पूर्वी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने मतदानाचा हक्क नाकारला आहे.या निर्णयावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रश्न निर्माण केला आहे.

 

राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी द्यावी असा अर्ज मलिक आणि देशमुख यांच्यावतीने न्यायालयात दाखल करण्यात आला होता. परंतू, कोर्टाने अर्ज नाकारल्यामुळे दोघांना मतदान करता येणार नाही. यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, “नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यावर अद्याप आरोप सिद्ध झालेले नसताना सुद्धा त्यांना मताधिकार नाकारणे ही संविधानाची पायमल्ली ठरत नाही का? जो निकाल आलाय तो आश्चर्यकारक आहे.

 

तर दुसऱ्या ट्विटमध्ये मिटकरी म्हणतात की, “संविधानिक अधिकार कुणालाही हिराऊन घेता येत नाही. लोकशाहीत मताधिकाराला महत्व आहे. दोघांनाही न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. उद्या भाजपाला पळता भुई थोडी होणार! तिन पटांची थोबाड बंद होण्यासाठी काही तास शिल्लक…” अशी टीकाही त्यांनी ट्विटद्वारे भाजपवर केली.

Team Global News Marathi: