पवार साहेब स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा; भाजपचे राष्ट्रवादीला खुले आव्हान

‘तुम्ही तर अजून साडेतीन जिल्ह्यात अडकलात’; शरद पवारांवर भाजपचा पलटवार

पवार साहेब स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा; भाजपचे राष्ट्रवादीला खुले आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या टीकेला भाजपने पलटवार केला आहे. राज्यात भाजपला पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असे आमदारांना संबोधित करताना पवार यांनी म्हटले होते. इतर प्रादेशिक पक्षांनी १० वर्षात दोन राज्यात सत्ता स्थापन केली आहे. मात्र पवार हे अजूनही साडे तीन जिल्ह्यातच अडकले आहेत, असे म्हणत ५५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा, अशा शब्दात भाजपने पवार यांच्यावर पलटवार केला आहे.

ठळक

भाजपचा शरद पवार यांच्यावर पलटवार.

पवार यांनी स्वत:च्या पक्षाचे ६० च्या वर आमदार निवडणून आणून दाखवावेत- भाजप.

राष्ट्रवादी साडेतीन जिल्ह्यांमध्येच अडकला आहे- भाजप.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी केलेल्या टीकेला भारतीय जनता पक्षाने (BJP) प्रत्युत्तर देत पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार यांनी भाजपची काळजी न करता त्यांनी स्वत:च्या पक्षाचे ६० च्या वर आमदार निवडणून आणून दाखवावे, असा टोला भाजपने पवार यांना लगावला आहे. इतर प्रादेशिक पक्षांनी गेल्या १० वर्षांमध्ये दोन राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली आहे. तुम्ही तर अजूनही साडेतीन जिल्ह्यांमध्येच अडकला आहात असे म्हणत तुमच्या ५५ वर्षांच्या कारकिर्दीत स्वत:च्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा, अशा शब्दांत भाजपने शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल असा दावा भाजप नेते सतत करत आहेत. तसेच गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय तपास यंत्रणा आक्रमकपणे काम करत असून माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यानंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. राज्यात भाजपला पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असे पवार यांनी म्हटले होते. पवार यांचे हे वक्तव्य भाजपच्या जिव्हारी लागल्याने भाजपने पवार यांनी हे प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे.

भाजपने ट्विट करत शरद पवार यांच्यावर ही टीका केली आहे. भाजपने आपल्या ट्विटमध्ये म्हटेले आहे, ‘आदरणीय @PawarSpeaks साहेब, भाजपची काळजी करू नका! स्वतःच्या पक्षाचे ६० च्या वर आमदार निवडून आणा. इतर प्रादेशिक पक्षांनी १० वर्षात दोन राज्यात सत्ता स्थापन केली आहे, तुम्ही अजून साडे तीन जिल्ह्यातच अडकलात. ५५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा!’

ग्लोबल न्युज नेटवर्क: