माजी मंत्री आदित्य ठाकरेंविरोधातील कारवाईवरुन नितेश राणेंचा टोला

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार स्थापन झाल्यावर त्याच दिवशी मुंबई मेट्रोचे कारशेड आरेमध्येच करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले. यावरून पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे आरे वाचवा असे आंदोलनही सुरू करण्यात आले आहे. या आंदोलकांना आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. मात्र, या आंदोलनासाठी लहान मुलांचा वापर झाल्याचा दावा केला जात आहे. यावरून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. यावरून भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी टोला लगावला आहे.

राज्य सरकारच्या आरेमध्ये कारशेड उभारण्याच्या निर्णयाविरोधात ‘आरे वाचवा’ आंदोलन तीव्र करण्यात आले आहे. त्यानुसार आरेतील पिकनिक पॉइंट येथे पर्यावरणप्रेमी, पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्था, राजकीय पक्षांनी निदर्शने केली. यावेळी आदित्य ठाकरेही आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनात लहान मुलांचा वापर करण्यात आल्याची तक्रार ‘सह्याद्री राइट फोरम’ने केली.

‘सह्याद्री राईट फोरम’चे विधी विभाग प्रमुख दृष्टीमान जोशी यांनी ट्विटरवरून राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडे केली होती. याची दखल घेत आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मुंबई पोलीस आयुक्तांना निर्देश देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात नितेश राणे यांनी ट्विट करत आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

नितेश राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, राष्ट्रीय बाल हक्क आयोग अशाप्रकारे जी व्यक्ती स्वत: एक लहान मुल आहे त्याला नोटिस कसे काय पाठवू शकते, हा अन्याय मान्य नाही, असे उपरोधिक विधान करत, या ट्विटमध्ये त्यांनी इमोजी वापरुन शेवटी, “बच्चे की जान लोगे क्या” असा टोलाही लगावला आहे. या टीकेला आता शिवसेना काय प्रतिक्रिया देते पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: