‘मैदान छोटे, आकडे खोटे आणि संजय राऊतांचे भोंगे मोठे’ भाजपचा टोला

 

राज्यात सत्तांतर झाल्यांनतर शिंदे फडणवीस सरकारला कोंडीत धरण्यासाठी महाविकास आघाडीकडून राज्यभरात वज्रमूठ सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज मुंबईतील बीकेसी येथे महाविकास आघाडीची वज्रमुठ ही सभा होणार आहे. मात्र या सभेसाठी शिवाजी पार्कसारखे मोठे मैदान न घेता बीकेसीमधील सर्वांत लहान मैदानाची निवड केल्यावरून सत्ताधाऱ्यांकडून ठाकरे गटावर टीका केली जात आहे. यासंदर्भात भाजपचे आमदार आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी खोचक टीका केली आहे.

बीकेसी येथील नरे मैदानात आज सभा होणार आहे. या सभेत ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे  आणि संजय राऊत बोलणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तर काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व भाई जगताप भाषण करणार असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर या सभेतही तिन्ही पक्षांकडून सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटावर हल्लाबोल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या सभेवर आशिष शेलार यांनी टीकास्र सोडले आहे. ‘मविआची वज्रमूठ सभा आज मुंबईत होतेय. मूठभर मैदान आणि मूठभर संख्या, आवाज मात्र मोठा. मैदान छोटे, आकडे खोटे आणि संजय राऊतांचे भोंगे मोठे. आवाज मोठा असला, तरी लोक जमा करण्यात सपशेल फेल ठरणारी ही सभा छोटं मैदान घेऊन मोठी संख्या दाखवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळेच मविआला मुंबईत जनसमर्थनच नाही आणि म्हणून छोटं मैदान घ्यावं लागलं असा जनतेचा समज आहे”, असं शेलार म्हणाले.

Team Global News Marathi: