महाविकासआघाडी सरकारने 2 वर्षात काय केलं?

 

मुंबई | आज महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकासआघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहे.दोन वर्षांपूर्वी या दिवशी ठाकरे सरकारने राज्याची धुरा सांभाळली होती. आजच्या दोन वर्षपूर्तीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला उद्देशून एक पत्र लिहिले आहे. या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेचे आभार मानले आहेत.

पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. या पत्रात त्यांनी राज्यातील विकास कामांची यादी वाचून दाखवली आहे. याशिवाय, राज्यातील जनतेने सरकारला केलेल्या सहकार्याबद्दलही आभार मानले आहेत. पत्रात उद्धव ठाकरे म्हणतात, अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती आल्या पण आम्ही विचलित झालो नाहीत आणि पुढेही होणार नाही. कितीही संकटे येवोत, सर्वसामान्यांच्या भल्यासाठी त्यांना केंद्रबिंदू मानून आमचं काम अखंड सुरू राहील अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेनं सरकारला आपलं मानून केलेल्या सहकार्यासाठी मन:पूर्वक धन्यवाद मानले. प्रशासनातील प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांचं राज्याच्या वाटचालीतलं योगदान तितकंच महत्त्वाचं आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी त्यांनाही धन्यवाद दिले.

मुख्यमंत्री पुढे म्हणतात, सरकारचा बहुतांश कालावधी कोविडचा अतिशय नेटानं, नियोजनबद्ध रितीनं मुकाबला करण्यात गेला. मात्र जगाला संकटात टाकणाऱ्या या विषाणूच्या आक्रमणाला न जुमानता, आपल्या सरकारनं वेगवेगळ्या आघाड्यांवर अधिक जोमानं काम करायला सुरुवात केली. संकटाचं संधीत रूपांतर केलं, हे आपणा सर्वांच्या समोर आहे. दोन वर्षांपूर्वीची आरोग्य आणि वैद्यकीय यंत्रणा तसंच साधन सुविधा आणि आत्ताच्या सुविधा यात मोठा फरक आहे. कोविडच्या या लढ्यात आपण या सुविधा मोठ्या प्रमाणावर वाढविल्या आहेतच शिवाय त्या कायमस्वरूपी झाल्या आहेत, त्यामुळे भविष्यात देखील विविध रोग आणि साथीचा मुकाबला आपण सक्षमपणे करू शकणार आहोत.

Team Global News Marathi: