महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे चालेल, राष्ट्रवादीच्या या नेत्याचा दावा !

पंढरपूर-मंगळवेढा पोट निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव करून दणदणीत विजय मिळवला होता. त्यातच आता पंढरपूर पोटनिवडणुकीमध्ये समाधान आवताडे यांचा विजय झाल्यानंतर राज्यात आता भाजपच्या ऑपरेशन लोटसची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर राज्यात सुरू असताना राजकारण तापतानाही दिसत आहे. मात्र, भाजपकडून केले जात असणारे दावे फेटाळत महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे चालेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना केला आहे. त्यामुळे आता भाजपा आणि राष्ट्रवादी असा नवा वाद राज्यात दिसून येणार आहे.

पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, तुम्ही पंढरपूरमध्ये भाजपला साथ द्या.मी राज्यात यांचा करेक्ट कार्यक्रम करतो, असे वक्तव्य केले होते. पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या त्या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यासंदर्भात हसन मुश्रीफ यांनी सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून भाजपकडून हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश येणार नाही. जोपर्यंत शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आहेत, तोपर्यंत सरकारला काही होणार नाही. महाविकास आघाडीचे हे सरकार पुढील २५ वर्ष चालेल, असा दावा मुश्रीफ यांनी केला आहे.

Team Global News Marathi: