महाविकास आघाडी सरकार यशस्वीपणे आपला कार्यकाळ पूर्ण करेल -शरद पवार यांनी व्यक्त केली खात्री

महाविकास आघाडी सरकार यशस्वीपणे आपला कार्यकाळ पूर्ण करेल -शरद पवार यांनी व्यक्त केली खात्री

नव्या नेतृत्वाला प्रोत्साहन देत जनसामान्यांच्या पाठीशी नेहमीच ठामपणे उभे राहा

खा. शरद पवार यांचे वर्धापन दिनानिमित्त आवाहन…

महाविकास आघाडी सरकार यशस्वीपणे आपला कार्यकाळ पूर्ण करेल याचीही व्यक्त केली खात्री

बार्शी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापन दिन आज साजरा होतोय. यानिमित्त पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना संबोधित करत त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी २२ वर्षांतील आठवणी जागवत पक्षाच्या आगामी वाटचालीबाबतही भूमिका स्पष्ट केली.

आजच्याच दिवशी २२ वर्षांपूर्वी आपण स्वतंत्र पक्ष उभारणीचा निर्णय घेतला होता. संघटना स्थापन करण्याचा जो निर्णय घेतला, त्याला जनमानसाने पाठिंबा दिला. या वर्षांमध्ये काही धक्के बसले. मात्र आपली वाटचाल योग्य दिशेने सुरु राहिली. आज त्याचा आढावा घेण्याचा दिवस असल्याचे पवार म्हणाले.

महाराष्ट्रातील जनतेच्या प्रेमाच्या बळावर आपण २२ वर्षे महाराष्ट्रात काम करु शकलो. यापैकी १७ वर्षे आपण सत्तेत राहिलो. पण सत्तेचा फारसा परिणाम पक्षावर होत नाही. दरम्यानच्या काळात अनेक लोक पक्षातून गेले-आले. पण पक्ष वाटचालीवर काही परिणाम झाला नाही. नवे नेतृत्व नेहमी तयार होत राहाते. आजच्या मंत्रिमंडळाकडे पाहिल्यास नवीन सहकारी सक्षमपणे आपली जबाबदारी पार पाडत असल्याचे समाधान पवार व्यक्त केले.

मागील वर्षी कोरोनाचे संकट संबंध देशावर आले. या महामारीत राज्य मंत्रिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांनी आपली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली. नव्या नेतृत्वाची फळी उभी करुन संपूर्ण राज्याला विश्वास देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने केले असल्याचे ते म्हणाले. राजकारणात सतत नव्या पिढीला संधी दिली पाहिजे. उत्तम काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. जिल्ह्याजिल्ह्यात अनेक कार्यकर्ते असे असतात की ज्यांच्याकडे आपण लक्ष दिले तर पुढील काळात राज्याचे नवे नेतृत्व आपण तयार करू शकतो. अशा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असेही पवार म्हणाले.

आज आपण राज्यात सत्तेत आहोत. सरकार चालवणे महत्त्वाचे आहेच. पण त्यासोबत संघटनेत नवे नेतृत्व निर्माण करण्याचे काम सुरु ठेवलेच पाहीजे. १० जून १९९९ रोजी आपण शिवाजी पार्कवर जो निर्णय घेतला होता त्या निर्णयाला सार्थ ठरविण्याचे काम या राज्यातील सामान्य जनतेने केले. त्यामुळे त्या सामान्यांच्या पाठिशी नेहमीच ठामपणे उभे राहण्याची भूमिका आपण पार पाडली पाहिजे.

आज आपण वेगळ्या विचारांचे सरकार स्थापन केले आहे. आपण कधी शिवसेनेसोबत जाऊ असा विचार कुणीही केला नव्हता. पण या पर्यायाचा विचार केला आणि लोकांनीही तो पर्याय स्वीकारला. त्याचा परिणाम म्हणून सत्तेत आलेले महाविकास आघाडीचे सरकार उत्तमरीत्या काम करत आहे. हे सरकार पाच वर्ष टिकेल. पाच वर्षानंतरही हे तीन पक्ष एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जातील, असे प्रतिपादन पवार यांनी केले.

कोरोना काळात गोरगरीब जनतेला मदत करण्याचे काम सरकारने केले. केंद्र सरकारने मोफत अन्नधान्य दिले होते. ते गरजूंपर्यंत पोहोचवण्यात आले. शिवभोजन थाळी हा उपक्रम यशस्वीपणे राबविला गेला. या संकटाच्या काळात आपण थांबलो नाही, डगमगलो नाही. आज राज्यात आरक्षणाचे प्रश्न आहेत. स्थानिक स्वराज संस्थेत आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. हे सर्व प्रश्न सोडवण्याची आपली भूमिका असल्याचे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रत्येक घटकाचा विचार करणारा पक्ष आहे, यादृष्टीने आपल्याला प्रत्येक निर्णय घ्यायचा आहे. हा पक्ष प्रत्येकाला आपला वाटला पाहिजे, असे काम आपल्याला करत राहायचे आहे. आपण सर्वांनी सुरू केलेल्या कामाला सामान्य नागरिकांचा पाठिंबा मिळो, अशी आशा व्यक्त करत पवार साहेबांनी सर्वांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, “ आदरणीय खा. शरद पवार साहेबांच्या राजकीय आयुष्यातील ही २२ वर्षे फार महत्त्वाची आहेत. राजकीय आयुष्य जगताना ते स्वाभिमानाने व सर्वधर्मसमभावाने कसे जगावे, हे पवार साहेबांनी आपल्याला शिकवले. दिल्लीच्या तख़्तासमोर महाराष्ट्र कधीच झुकला नाही. १९९९ पासून आपलं पक्ष सत्तेत आला. पुढील १५ वर्षे पक्ष सत्तेत राहिला. आम्हा सगळ्यांनाच सुरुवातीपासून पक्षाच्यावतीने पवार साहेबांनी मोठी जबाबदारी दिली. आज मागे वळून पाहताना पवार साहेबांनी घालून दिलेल्या आदर्शातून पक्ष पुढे आला असल्याचे स्पष्ट होते. देशाच्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड मोठी लाट देशात आली. आपल्या पक्षाचे अनेक सहकारी पक्ष सोडून गेले. पण पवार साहेबांनी हिंमत हारली नाही.

२०१९ साली साहेबांच्या पुढाकाराने राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. राज्य सरकारमधील पक्षाच्या सर्व नेत्यांनी आपल्या जबाबदारीचे भान राखून जनतेच्या हिताचे काम केले आहे. राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मा. उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. कोरोना काळात राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही आर्थिक घडी योग्यरित्या घालण्याचे काम अजितदादांनी केले. पक्षाच्या फ्रंटल सेलच्या माध्यमातून जनतेच्या हिताचे अनेक कार्यक्रम हाती घेण्यात आले. यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जागर रोजगाराचा हे नवीन अॅप होतकरू युवकांसाठी सुरु करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

युवती काँग्रेसच्या माध्यमातून दिव्यांग युवतींना मदतीचा हात दिला गेलाय. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी महिला काँग्रेसच्या वतीने पक्ष घरोघरी नेण्याचे काम करण्यात आले. पक्ष बळकट करण्यासाठी महाराष्ट्रात यापुढेही अधिक जोमाने काम केले जाईल. पुढील काळात पक्षाच्या वतीने आरोग्य दिंडी हाती घेतली जाणार आहे. यातून लोकांमध्ये कोरोना, म्युकर मायकोसिस, लसीकरणसारख्या विषयांची जागृती करण्याचे काम होईल. कोरोना संक्रमण कमी झाल्यावर पक्ष बळकटीसाठी महाराष्ट्र दौरा आखला जाईल. यातून कार्यकर्त्यांशी थेट बोलण्याची संधी मिळेल. तसेच आजपासून पक्षाच्या सभासद नोंदणीचे काम सुरू करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीसोबत पारंपरिक पत्रकाच्या पद्धतीने सर्वांना नोंदणी करता येईल. आजपर्यंत आपण सर्वांनी पक्षाला साथ दिली आहे. यापुढेही पक्ष वाढविण्याचे काम आपण करू.”

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या तमाम कार्यकर्त्यांचे त्यांच्या पक्ष उभारणीसाठीच्या मेहनतीबद्दल आणि त्यागाबद्दल अभिनंदन केले आणि आभार मानले. कार्यकर्ता हाच खरा पक्षाचा कणा असतो, त्यांच्याशिवाय कोणताही पक्ष काम करु शकत नाही, असे अजितदादा म्हणाले.

ज्याप्रकारे महाराष्ट्र राज्याची स्थापना संघर्षातून झाली तशाच प्रकारे संघर्षातून राष्ट्रवादीचीही स्थापना झाली. २०१४ चा अपवाद वगळला तर राज्यातील लोकांनी नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसवर आपला विश्वास व्यक्त केलेला आहे. जनतेच्या प्रेमाच्या बळावर पक्षाने राज्यातील प्रत्येकाच्या मनामनात जागा मिळवली. सर्व घटकांना सोबत घेऊन पक्ष वाटचाल करत आहे, व पुढेही अशीच वाटचाल सुरु राहील, असा विश्वास अजितदादांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, हृद्यात राष्ट्र आणि नजरेसमोर महाराष्ट्र असा विचार घेऊन पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. प्रत्येक क्षेत्रातल्या जाणकार, अभ्यासू लोकांना सोबत घेऊन राष्ट्रवादीची वाटचाल सुरु झाली होती. त्या सर्वांनी आपापल्या परीने मागच्या २२ वर्षात योगदान दिले. संघर्षाशी आणि आव्हानांशी लढणे हा राष्ट्रवादीचा गुणधर्म आहे. कोरोना काळ असो की वादळ वा अतिवृष्टीचे संकट राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येक ठिकाणी संघर्ष केला. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी कोरोना काळात लोकांना मदत देण्याची भूमिका घेतली. आपल्याला पुढचे काही दिवस अशी मदत करावी लागणार आहे. महाविकास आघाडीकडून घेतले जाणारे लोककल्याणाचे निर्णय तळागाळात पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे.

भाजपच्या काळात देशात दमनशाहीचा कारभार सुरु असून लोकशाही मोडून काढण्याचा प्रकार सुरु आहे. पत्रकारांवर निरनिराळे निर्बंध आणून त्यांना सरकारच्या बाजूनेच बोलायला भाग पाडले जात आहे. आपण सर्वांनी लोकशाही अबाधित राखण्यासाठी काम करायचे आहे. पेट्रोल-डिझेलचे दर शंभरी गाठत आहेत. घरगुती गॅसचे दर वाढले आहेत. विमान-रेल्वेचा प्रवास महागला आहे. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या सर्व प्रश्नांवर देखील आपल्याला काम करायचे आहे. मराठा समाजाचे आरक्षण, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण आणि इतर प्रश्नांवर देखील काम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे.

कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, अशी आपली भूमिका आहे. आज राज्यात राष्ट्रवादीचा सहभाग असलेले महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे जनतेवर अन्याय होईल असा कोणताही निर्णय आम्ही होऊ देणार नाही. संकटे कितीही येवोत हा महाराष्ट्र कधीही झुकला नाही, झुकणार नाही. संकटावर मात करुन हा महाराष्ट्र सर्वांच्या पुढेच राहील, अशी ग्वाही त्यांनी वर्धापन दिनाच्या निमित्ताने दिली.

खा. प्रफुल पटेल म्हणाले की, पक्षाची स्थापना जेव्हा झाली, तेव्हा अनेकांनी शंका उपस्थित केली होती की हा पक्ष किती दिवस टिकेल. मात्र आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वात आपण पक्षाच्या स्थापनेनंतर २२ वर्षांचा यशस्वी प्रवास केला आहे, इतकेच नाही तर १७ वर्षे आपण राज्यात सत्तेत राहिलो आहोत. २०१९ मध्ये पवार साहेबांनी अशक्य ते शक्य करून दाखवत राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करण्याची किमया केल्याचे प्रफुल पटेल म्हणाले.

देशात अनेक राज्यात नुकत्याच निवडणुका झाल्या. यात चित्र पाहिले तर देशाच्या राजकारणात निश्चितच उलथापालथ होत आहे. या परिस्थितीत भविष्यात देशाच्या व्यापक व्यासपीठावर पवार साहेबांची मोठी गरज लागणार आहे. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय पातळीवर पक्षाचे राजकीय वजन वाढवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी सत्ता आणली. त्यांच्या वेगळ्या पक्षाची सुरुवात त्यांच्यासह अजून केवळ तीन आमदारांनी झाली होती. पण त्यांनी कठोर संघर्ष करून त्यांच्या पक्षाला आज इतके पुढे आणले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर स्थापनेपासूनच सत्तेत राहिला. आपले नेते हे देशातील सर्वात अनुभवी नेते आहे. त्यामुळे त्यांना ताकद देऊन त्यांच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र उभा करण्याचे काम आपल्याला करायचे आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचे कर्ताधर्ताही पवार साहेब आहेत. सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक संकटांचा मुकाबला आपण यशस्वीपणे केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्ष संघटनेला संघटनेला बांधून ठेवण्याचे काम केले आहे. त्यामुळे आपल्या सर्वोच्च नेत्याच्या पाठीमागे संपूर्ण ताकद उभा करून पक्ष बळकटीसाठी आपण सर्वांनी काम केले पाहिजे, असे आवाहन प्रफुल पटेल यांनी केले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील यावेळी उपस्थितांशी संवाद साधत कोरोना काळात केल्या गेलेल्या कामाची माहिती दिली. कोरोना महामारीच्या काळात आदरणीय खा. शरद पवार साहेबांपासून प्रेरणा घेऊन नेते ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनीच चांगले योगदान दिले. कोरोनाची पहिली लाट आली असताना आम्ही सर्वांनी काळजीपोटी आदरणीय खा. शरद पवार साहेबांना घरीच थांबण्याचा सल्ला दिला होता. मात्र तरिही पवार साहेबांनी काही काळानंतर बाहेर पडून जनतेसाठी राज्यभर दौरा केला. साहेबांच्या या दौऱ्यामुळे सर्वांनाच प्रेरणा, ऊर्जा मिळाली. ठिकठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासला तेव्हा ती पुरवण्याचे कामही पवार साहेबांनी केले होते. साहेबांच्या या दौऱ्यामुळे अनेकांना धैर्य आले, असे राजेश टोपे म्हणाले.

कोरोनाची दुसरी लाट आता ओसरायला लागली आहे. राज्यातील रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांपर्यंत आला असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे. तरीही वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, आपण कोविड प्रोटोकॉल पाळलाच पाहीजे. कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियम पाळणे यापुढेही आवश्यक आहे. आपत्तीमधून इष्टापत्ती, अशी म्हण आपल्याकडे आहे. या आपत्तीमध्ये उत्तम काम करणारे नेतृत्व गावागावांमध्ये निर्माण झाले. या काळात आपल्याला नवे नेतृत्व निर्माण करायला हवे. पक्षाचा वैद्यकीय कक्ष स्थापन करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. सरकारी नियमावलीचे पालन करुन राष्ट्रवादी वैद्यकीय कक्षाने काम केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

खासगी रुग्णालयांच्या शुल्क आकारणीबाबत कॅपिंगचे नियम राज्य सरकारने घालून दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेशही दिले आहेत. या आदेशांचे पालन होत आहे की नाही? याकडे लक्ष ठेवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी करावे. रुग्णालये सीटी स्कॅनबाबात, औषधांबाबत किंवा मास्क, पीपीई कीट्स बाबत किती दर लावत आहेत. याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवून सामान्यांना मदत करावी. यापुढे लसीकरण हा सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम असणार आहे. महाराष्ट्र राज्य हे दररोज १० लाख नागरिकांचे लसीकरण करण्यास सक्षम आहे. लसीकरण सुलभ पद्धतीने होण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपापले योगदान द्यावे. जनतेमध्ये जागृती निर्माण करावी, असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी निधी दिल्यामुळे आरोग्य विभागातील पदे भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. रुग्णालयांच्या अर्धवट बांधकामांना पूर्ण करण्यासाठी चार हजार कोटींची तरतूद केली आहे. पक्षाच्या मंत्र्यांची ही कामे कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन सांगायला हवी अशी अपेक्षा व्यक्त करत आदरणीय पवार साहेबांचा सामाजिक, राजकीय विचार रुजविण्यासाठी सर्वांनाच प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खा. सुनील तटकरे, खा. सुप्रियाताई सुळे, गृहनिर्माण मंत्री ना. जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे, अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक, सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील, औषध व अन्न प्रशासन मंत्री ना डॉ. राजेंद्र शिंगणे, राज्यमंत्री मा. संजय बनसोडे, आ. शशिकांत शिंदे, आ. संजय दौंड, कोषाध्यक्ष हेमंत टकले, माजी आ. विद्या चव्हाण, माजी आ. प्रकाश गजभिये, माजी आ. संजय कदम, माजी आ. अनिल गोटे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, डॉक्टर सेल प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, सामाजिक न्याय सेल माजी आ. जयदेव गायकवाड, सेवा दल प्रदेशाध्यक्ष दिपक मानकर, ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे, लिगल सेल प्रदेशाध्यक्ष अशिष देशमुख, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, अल्पसंख्याक सेल प्रदेशाध्यक्ष मोहम्मद खान पठाण, अल्पसंख्याक सेल कार्याध्यक्ष जावेद हबीब, चित्रपट, कला आणि सांस्कृतिक सेल प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, ग्रंथालय सेल प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील हे उपस्थित होते.

Sharad Pawar Jayant Patil – जयंत पाटील Praful Patel Sunil Tatkare Dilip Walse Patil Ajit Pawar Rajesh Tope Supriya Sule Jitendra Awhad Dhananjay Munde Nawab Malik
Namdar Balasaheb Patil Dr.Rajendra B. Shingne Shashikant Shinde Hemant Takle
Rupali Chakankar Narendra Kale Mahebub Shaikh Ravikant Varpe Suraj Chavan
Sakshna Salgar

#NCP22 #NCP #FoundationDay

ग्लोबल न्युज नेटवर्क: