ग्लोबल न्यूज – रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्या खाली अडकलेलया नागरिकांना बाहेर काढण्याचे बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. विशेष म्हणजे 18 तास या ढिगा-या खाली अडकून पडलेल्या 4 वर्षाच्या एका चिमुकल्याला सुखरूप बाहेर काढण्यात ‘एनडीआरएफ’च्या टिमला यश आले आहे. ‘देव तारी त्याला कोण मारी’, याची प्रचिती यानिमित्ताने याठिकाणी आली.
तब्बल 18 तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या या चिमुरड्याचे नाव मोहम्मद मोहसीन बांगी असे आहे. मोहम्मदच्या चेहऱ्याला आणि डोक्याला जखमा झाल्या आहेत. या इमारतीत मोहम्मद याच्यासह त्याच्या दोन बहिणी आणि आई राहत होती.
त्याचे वडील दुबई येथे कामाला असल्याची माहिती मोहम्मदच्या आत्याने एका दूरचित्रवाहिनीशी बोलताना दिली. सध्या एनडीआरएफचे जवान मोहम्मदची आई आणि दोन बहिणींचा शोध घेत आहेत.
मोहम्मद बांगी या चिमुकल्याला ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढल्यानंतर सगळ्यांचाच चेहरा आनंदाने उजळून निघाला.
यावेळी टाळ्यांचा कडकडाट झाला. शिवाय ‘गणपती बाप्पा मोरया’,च्या घोषणाही देण्यात आल्या. तब्बल 18 तास मोहम्मदने आपल्यावर ओढावलेल्या परिस्थितीशी झुंज दिली. शेवटी तो या संकटातून बाहेर पडला.