मग 2 वर्षे फक्त खोक्यांची ओझी वाहत होता? पुन्हा शिवसेनेनं साधला शिंदेंवर निशाणा

 

‘फॉक्सकॉन’ची लूट शिवसेनेने उघड केली नसती तर हा घास पचवून त्यांनी आणखी काही गिळले असते. शिंदे गटाच्या पाठीमागे असलेल्या महाशक्तीने महाराष्ट्राशी उभा दावा मांडला आहे. शिंदे मात्र सर्व खापर शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या सरकारवर फोडून स्वतःचे अपयश झाकत आहेत. शिंदे यांचे नाव बदलून यापुढे श्रीमान खापरफोडे असेच ठेवायला हवे, अशी जळजळीत टीका शिवसेनेनं केली आहे. वेदांता – ‘फॉक्सकॉन’ प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेनं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.

‘वेदांता-फॉक्सकॉन हा मोठा औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्रातून खेचून गुजरातला नेल्याचे वृत्त धक्कादायक आहे. याआधी मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातने असेच पळवून नेले. आता फॉक्सकॉन हातचे गेले. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला याचे खापर मुख्यमंत्री शिंदे यांनी आधीच्या महाविकास आघाडी सरकारवर फोडले.

काय तर म्हणे, या प्रकल्पास दोन वर्षांत प्रतिसाद मिळाला नसेल. मग हे महाशय गेले दोनेक वर्षे त्याच सरकारचे महत्त्वाचे मंत्री होते. मग दोन वर्षे काय फक्त खोक्यांची ओझी वाहण्यातच हे व्यस्त होते? असा टोला शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांना लगावला. ‘फडणवीस यांनी त्यांच्या काळात आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईतून उचलून गुजरातच्या हवाली केले तसे मुख्यमंत्री शिंदे यांनी फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातच्या हातावर उदक सोडावे तसा सोडला. उद्या हे याच पद्धतीने मुंबईचा देखील सौदा केल्याशिवाय राहणार नाहीत. फॉक्सकॉन ही तर सुरुवात आहे. ‘आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिले.

तुमच्या आमदारांना पाच-सहाशे खोके दिले. त्या बदल्यात मुंबई-महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या आमच्या हाती द्या’, असा हा सरळ सरळ सौदा दिसतो. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी फॉक्सकॉन महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याबद्दल चिंता व्यक्त केली हे बरेच झाले; पण महाराष्ट्रावर आर्थिक हल्ला करणारे व येथील लाखभर तरुणांचा रोजगार हिरावून घेणारे दुसरे-तिसरे कोणी नसून त्यांचे मित्र भाजपवालेच आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीची सर्व इंजिन व डबे ते गुजरातला वळवतील, अशी टीकाही सेनेनं केली.

 

Team Global News Marathi: