हरल्या म्हणून काय झालं ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा पूर्ण अधिकार – संजय राऊत

मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, ममता बॅनर्जी निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत. बंगालमध्ये विधान परिषद नाही, त्यामुळे त्या शपथ घेऊ शकत नाहीत, असे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. यावर हरल्या म्हणून काय झालं. ममता दीदींना बंगालच्या जनतेने स्वीकारले आहे. त्यामुळे त्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, अशी भूमिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. आमच्या ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. हा विजय केवळ आणि केवल त्यांचा आहे. त्यांच्या समोर बडे नेते होते. त्या सर्वांना त्यांनी भूईसपाट केलं आहे. त्यामुळे हा निव्वळ त्यांचा विजय असून आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत, असे संजय राऊत म्हणाले.

पुढे राऊत म्हणाले की, यापूर्वी लोकसभेला पराभूत झालेल्यांना मंत्रिमंडळात शपथ देण्यात आली होती. स्मृती ईराणी, शिवराज पाटील यांनी शपथ घेतली होती. मोरारजी देसाई विधानसभेला पराभूत झाले होते. परंतु त्यांनीही मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे या किरकोळ गोष्टी उभ्या करण्यात अर्थ नाही. ममता बॅनर्जी या नेत्या आहेत. त्या नंदीग्राममधून हरल्या असल्या तरी बंगालच्या जनतेने त्यांना स्वीकारलं आहे. त्यामुळे त्या शपथ घेऊ शकतात, असंही राऊत म्हणाले आहेत.

Team Global News Marathi: