2 एप्रिलपासून पुण्यात लाॅकडाऊन ? अजितदादांचे संकेत

पुणे : शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. पुढील आठ दिवसात शहरातील रुग्णसंख्या कमी झाली नाही तर नाईलाजास्तव पुढच्या शुक्रवारी ( 2 एप्रिल) लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे पुढचे आठ दिवस पुणेकरांसाठी महत्त्वाचे असल्याचेही पवार यांनी सूचित केले आहे.

 

पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीला सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.

पवार म्हणाले, पुढच्या शुक्रवारी लॉकडाऊनच्या बद्दल निर्णय घेण्यात येईल. कितीही इच्छा नसली तरी येत्या पाच सहा दिवसात अशीच रुग्णवाढ होत राहिली तर लॉकडाऊनशिवाय पर्याय राहणार नाही.

ते म्हणाले, आज झालेल्या बैठकीत अनेकांचे खासकरून वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींचे असे मत होते की कोरोना प्रादुर्भावाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊन करावा लागेल.

लसीकरण केंद्राची संख्या दुप्पट करणार

शहरातील कोरोना बाधितांची संख्या पाहता सध्या 50 टक्के खाजगी रुग्णालयाचे बेड ताब्यात घेतले आहे. परिस्थिती गंभीर असून आता नाईलाजास्ताव कठोर निर्णय घ्यावे लागणार आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी लसीकरण केंद्र दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरण केंद्राची संख्या 300 वरून 600 वर करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी लसीचे अतिरिक्त डोस पुरवण्याची मागणी केली आहे. प्रकाश जावडेकरांनी मदतीचे आश्वासन दिले आहे, असे पवार यावेळी म्हणाले.

आजच्या बैठकीत घेण्यात आलेले नवे नियम

1 एप्रिलपासून सर्व लोकप्रतिनिधींचे खासगी कार्यक्रम पूर्णपणे बंद
शाळा-महाविद्यालये 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील.
मॉल, चित्रपटगृहांसाठी 50 टक्के उपस्थितीचा नियम
सार्वजनिक बस वाहतूक सुरू
लग्न समारंभात 50 लोकांची उपस्थिती
अंत्यविधीसाठी 20 लोकांचीच परवानगी
सार्वजनिक उद्याने, बागबगीचे फक्त सकाळीच सुरू

लॉकडाऊन केला तर गोरगरीबांचा रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण होतो. तो होऊ द्यायचा नाही म्हणून नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक आहे, असे आवाहन पवार यांनी या वेळी केले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: