जीविका की उपजीविका : काही जगायचे राहून गेले…पत्रकारितेचे वास्तव

जीविका की उपजीविका : काही जगायचे राहून गेले…

….तरीही माझे मन आता मला पत्रकारितेत रमण्याची परवानगी देत नाही. हा निर्णय जितका हळवा आहे, तितकाच कठोरही. भविष्याबद्दलची अनिश्चितता वाढवणारा तसाच वर्तमानाबद्दल आश्वस्तही करणारा आहे. आता मी मनासारखं जगणार आणि जे काही राहून गेलं ते पूर्ण करणार. ऊर्मींचा कोंडमारा असा किती काळ सहन करायचा? त्याचे माझ्यापुरते उत्तर मी शोधले आहे. पत्रकारितेतील माणसांना मनासारखं नाही जगता येत. जगण्याची चैन परवडत नाही. या व्यवसायाला तो शाप आहे. या क्षेत्रातील सर्वच माणसं संवेदनशील आणि मनस्वी आहेत. काहीच जमलं नाही म्हणून पत्रकारितेत आले, असं कुणी म्हणत असेल तर ते पाप आहे.

  • गजानन जानभोर

दि. ३१ जुलै २०२०

‘लोकमत’ सोडण्याचा निर्णय माझ्यासाठी जीवाची घालमेल वाढविणारा. २५ वर्षाची पत्रकारिता. नाव, वलय, प्रतिष्ठा एका क्षणात सोडायची? मित्रांनी समजावलं, ‘‘तुला या सर्व गोष्टींची आता सवय झालीय. पद गेल्यानंतर कुणी विचारणार नाही, त्यातून निराशा येईल, तू जगू शकणार नाहीस!’’

अंर्तमनाने सांगितलं, ‘‘आतातरी तू मनाने खरंच जगत आहेस का? जे काही करतो ते उपजीविकेसाठी! जीविकेचे काय? लहानपणापासून हार्मोनियम वाजविण्याचं स्वप्न! काय झालं त्याचं? शिकतानाच नोकरी करावी लागली. लहानपणी नाटकात कामे करायचा, शिक्षकांच्या नकला करायचा! हे सर्व सोडून दिलं ना मधेच! आता करू शकतो, नाही ना? कारण नोकरी, प्रतिष्ठा आड येते. रोज मुलांमध्ये स्वत:चं विस्कटलेलं बालपण शोधतो, आनंदित होतो; पण त्याच वेळी आतल्या आत रडतही असतो. गजू, आयुष्य एकदाच मिळते. आयुष्याच्या संध्याकाळी स्मरण-विस्मरणाच्या हिंदोळ्यावर मन बेचैन असते. जगाचा निरोप घेताना डोळ्यात पाणी असते, ते वियोगाचं नसतेच. काही गोष्टी आपण नाही करू शकलो, त्या दु:खाचे ते प्रतिबिंब असते.’’ मनात हे असे द्वंद्व बऱ्याच दिवसांपासून सुरू… शेवटी निर्णय घेतला…

आता मी मनासारखं जगणार आणि जे काही राहून गेलं ते पूर्ण करणार. कोरोनाने तसंही आपल्याला अंतर्बाह्य बदलविलेलं आहे. पुढे काय होणार? ठाऊक नाही. भविष्य तसे धूसरच. मरण्याचं भय तेवढं सतावत असते. मी यातून अलिप्त कसा राहू शकतो? कारण उद्या मी असेन/नसेन!… पत्रकारितेतील माणसांना मनासारखं नाही जगता येत. जगण्याची चैन परवडत नाही. या व्यवसायाला तो शाप आहे. या क्षेत्रातील सर्वच माणसं संवेदनशील आणि मनस्वी आहेत. काहीच जमलं नाही म्हणून पत्रकारितेत आले, असं कुणी म्हणत असेल तर ते पाप आहे.
इतर क्षेत्रांतल्या लोकांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे काम मिळते, सन्मानही मिळतो आणि अर्थार्जनही होते. पत्रकारितेत कामाशिवाय आणि अस्वस्थतेखेरीज दुसरं काहीही मिळत नाही. पत्रकारितेत सक्रिय असेपर्यंत या व्यवसायातल्या माणसांना आजकाल जे काही करावं लागते, ते मीही केले. पण, माझी अस्वस्थता काहीशी वेगळी. उमेदीचे वय जगायचे राहून गेले आणि भविष्यात कसे जगायला मिळेल याची चिंता. आपण ना भूतकाळ बदलू शकत, ना भविष्याबद्दल निश्चित काही सांगू शकत. त्यामुळे फक्त आजचा दिवस जगण्यासाठी मी पत्रकारितेतून मुक्त झालो.

लोकमतने मला सांभाळले. मोठे केले. लोकमत परिवाराचे माझ्यावर मोठे ऋण आहे. मला लोकमतचा विसर कधीही पडणार नाही. तरीही माझे मन आता मला पत्रकारितेत रमण्याची परवानगी देत नाही. हा निर्णय जितका हळवा आहे, तितकाच कठोरही. भविष्याबद्दलची अनिश्चितता वाढवणारा तसाच वर्तमानाबद्दल आश्वस्तही करणारा आहे. माणसाला जगायला फार काही लागत नाही. फक्त गरजा तेवढ्या कमी करायच्या. माझी आणि कुटुंबाची ती तयारी आहे. ‘तू आपल्या घरात सर्वात लहान आहेस, कबीर, महीसारखं जगून घे,’ बायकोने माझी अस्वस्थता ओळखली…

कोरोनाने एकच शिकवले, आता कोणतीच गोष्ट पुढे ढकलायची नाही. पत्रकारिता मनापासून केली. मर्यादा सांभाळल्या. काही सांभाळता आल्या नाहीत. पण, हा निर्णय घेताना मनात कुठलीही खंत नाही. आयुष्य जिकडे नेईल, तिकडे जात राहायचे. हा निर्णय माझा आहे. त्यामुळे त्याचे जे काही बरे-वाईट परिणाम असतील, ते मला मान्य आहेत. ज्याला निर्णय घेण्याचा अधिकार हवा असतो, त्याने जबाबदारीही घेतली पाहिजे. ती मी कधीचीच स्वीकारली…
जीविका आणि उपजीविकेचं संतुलन पत्रकारितेत नाही. काय आहे ही जीविका? जीविका म्हणजे आपल्या जगण्याचं प्रयोजन. आणि उपजीविका, आपलं पोट भरण्यासाठी आपण जे काही करतो ते. आपण उपजीविकेत पार पिचून जातो. उपजीविकेतच जीविकाही शोधू लागतो. ती सापडत नाही तेव्हा नैराश्य येते. उपजीविकेतून आपलं पोट भरते आणि जीविकेतून जगण्याचं समाधान मिळते. ते समाधान पैशात मोजता येत नाही. त्या सुखाचे मोलही करता येत नाही. जन्म झाल्यापासून सामान्यांच्या आयुष्यात येणारी चक्री मलाही मिळाली. ती पायाला लावून फिरत राहिलो. जगत राहिलो. ‘‘पण, आतातरी उपजीविका आणि जीविका वेगळी कर गजू,’’ मनाने शेवटी कौल दिला.

हे सगळं कितपत जमेल? आज सांगता येत नाही. पण, हा व्यवसाय सोडला तर जीविकेच्या मिठीत विरंगुळ्याचे क्षण उपभोगण्याची संधी मिळेल, असा विश्वास आहे. ती संधी मला घ्यायची आहे आणि त्यासाठी आयुष्याच्या संधिकालाची वाट पाहायची नाही. पोट जनावरेही भरतात. माणसांना त्याहून वेगळी बुद्धिमत्ता, मन, आत्मा वगैरे आहे म्हणतात. तो खरोखर असेल तर त्यातून येणाऱ्या ऊर्मींचा कोंडमारा किती काळ सहन करायचा? त्याचे माझ्यापुरते उत्तर मी शोधले आहे. बाकी या निर्णयात फार मोठा अलौकिक अर्थ वगैरे शोधण्याचा खटाटोप मी करणार नाही. इतर कुणीही करू नये. मी फार लहान माणूस आहे.

मात्र पुढची काही वर्षे मन मारुन जगायचे नाही, मुलांना वेळ द्यायचा, आप्तमित्रांना भेटत राहायचे, पेटी वाजवायची, लेखन करायचे. उपेक्षित सामाजिक कार्यकर्त्यांना मदत करायची आणि आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी कष्ट करायचे…एवढेच सध्या मी ठरवलेले. काही वर्षांनी हे सारे जगून झाल्यासारखे वाटेल आणि पत्रकारितेत आपल्यासाठी काही जागा आहे, असे वाटले तर कदाचित पुन्हा परत येईन. विदर्भ आणि महाराष्ट्रात पत्रकारितेमुळे मला असंख्य मित्र मिळाले. शत्रू तसे नाहीत. कुणी अज्ञात असतील तर त्यांच्यावरही मी प्रेम करतो. कुणाचाही दु:स्वास करायचा नाही. रागलोभाच्या पलीकडे एक तृप्त, प्रशांत जगायचे आहे. त्यात मनसोक्त डुंबायचे आहे. वाहत जायचे आहे. त्यातून कुठल्या चांगल्या प्रवाहाला मिळालो तर तोही आपलासा करेन… तुम्ही सगळे सोबत आहातच…

  • गजानन जानभोर — दि. ३१ जुलै २०२० फेसबुक वरून साभार
ग्लोबल न्युज नेटवर्क: