विधानपरिषदेची रणधुमाळीला सुरवात कोल्हापूरसह ६ जागांसाठी निवडणूक जाहीर !

 

मुंबई | राज्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील रिक्त होत असलेल्या ८ पैकी ६ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. नगर आणि सोलापूर वगळता मुंबई, कोल्हापूर, धुळे-नंदुरबार, अकोला-बुलढाणा-वाशिम आणि नागपूर या ५ मतदारसंघातील ६ जागांसाठी १० डिसेंबरला मतदान होणार आहे. तर मतमोजणी १४ डिसेंबरला होणार आहे. या ८ आमदारांची मुदत येत्या १ जानेवारी २०२२ रोजी संपत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खेचाखेची सुरु होणार आहे.

नगर आणि सोलापूर या मतदारसंघातील मतदार अर्थात महानगरपालिका, नगरपालिकांचे नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती यांची संख्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याने या ठिकाणी निवडणूक जाहीर करण्यात आलेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका पार पडल्यानंतर त्या घोषित होण्याची शक्यता आहे.

येत्या १ जानेवारी २०२२ निवृत्त होत असलेले आमदार : निवृत्त होत असलेल्या आमदारांच्या यादीत रामदास कदम (शिवसेना) मुंबई, भाई जगताप (काँग्रेस) मुंबई, सतेज पाटील (काँग्रेस) कोल्हापूर , प्रशांत परिचारक (अपक्ष) सोलापूर, अमरिश पटेल (भाजप) धुळे- नंदुरबार, गोपीकिशन बजोरिया (शिवसेना) अकोला-बुलढाणा , गिरिशचंद्र व्यास (भाजप) नागपूर, अरूण जगताप (राष्ट्रवादी) नगर यांचा समावेश आहे.

Team Global News Marathi: