विधानपरिषद निवडणूक: भाजपाचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाईं जगताप यांच्यात होणार लढत – सदाभाऊ खोत यांची माघार

विधानपरिषद निवडणूक: भाजपाचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाईं जगताप यांच्यात होणार लढत – सदाभाऊ खोत यांची माघार

मुंबई :- विधान परिषदेच्या निवडणुकीतही राज्यसभेप्रमाणेच ‘बिग फाईट’ होणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. भाजपाचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड (Prasad Lad) आणि काँग्रेसचे (Congress) दुसरे उमेदवार भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्यामध्ये लढत होणार आहे. आकड्यांचे गणित काँग्रेसच्या बाजूने असले तरी, काँग्रेसला भाजपाच्या ‘चमत्कारा’चा धसका आहे.

भाजपा (BJP) समर्थित अपक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी माघार घेतली आहे. त्यानंतर दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे भाजपला लाड यांच्या विजयाकडे संपूर्ण लक्ष केंद्रित करता येणार आहे तर, आघाडीला राज्यसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अपक्षांना पुन्हा एकदा गोंजारावे लागणार आहे. अपक्षांना आपल्याकडे वळवण्याची कसरत काँग्रेसला करावी लागणार आहे.

निवडणुकीचे गणित

निवडणुकीत पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला २६ मतांची गरज आहे. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख व नवाब मलिक हे तुरुंगात असल्याने हा कोटा एकने कमी झाला आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार महाविकास आघाडीचे १५२, भाजपाचे १०६, अपक्ष तेरा आणि छोट्या पक्षाचे १६ असे २८७ आमदार आहेत. मंत्री नबाव मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना मतदानाचा हक्क न्यायालायने नाकारला आहे. त्यामुळे २७ मतांचा कोटा थोडा कमी होण्याची शक्यता आहे.

भाजप व मित्रपक्षांचे ११३ आमदार धरल्यास त्यांचे चार उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. पाचवे उमेदवार लाड यांना विजयासाठी इतरांच्या १७ मतांची गरज आहे. आघाडीचे गणित एकदम काठावर आहे. शिवसेनेचे दोन उमेदवार सहज निवडून येतील. त्यांच्याकडे अतिरिक्त तीन मतं उतरतात. राष्ट्रवादीचे ५१ आमदार आहेत. त्यांना एका मताची गरज आहे. तर काँग्रेसचे ४४ आमदार असून दुसऱ्या उमेदवाराला म्हणजे जगताप यांना विजयासाठी आठ मतांची गरज आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपाने चमत्कार घडवत तिसरा उमेदवार निवडून आणला. भाजपाच्या तिन्ही उमेदवारांना एकूण १२३ मतं मिळाली. प्रत्यक्षात भाजपकडे ११३ मतं होती! त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीतही एवढी मतं पडल्यास लाड यांना विजयासाठी आणखी केवळ सात मतांची गरज आहे. त्यामुळे भाई जगताप आणि लाड यांच्यातील लढतीत मोठी चुरस स्पष्ट आहे.

भाजपाकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड हे उमेदवार आहेत. त्यात लाड हे पाचवे उमेदवार आहेत. तर काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप, राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर व एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमश्या पाडवी हे मैदानात आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: