खासदारांच्या पगारात वर्षभर 30 टक्के कपात
ग्लोबल न्यूज: कोरोना टेस्टमध्ये लोकसभेच्या तब्बल 30 खासदारांसह 50 कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली आहे. भाजपाच्या मीनाक्षी लेखी, परवेश वर्मा, सुखबीर सिंग, प्रतापराव जाधव, सत्यपाल सिंह, जर्नादन सिंह, हनुमान बेनिवाल यांच्यासह इतर खासदारांचा यात समावेश आहे. कोरोनाचा वाढता प्रकोप व कोरोनाग्रस्त खासदारांची वाढती संख्या लक्षात घेता संसदेचे पावसाळी अधिवेशन नियोजित कार्यक्रमापूर्वीच गुंडाळले जाण्याची शक्यता आज पहिल्या दिवसापासूनच वर्तवली जात आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. कर्मचाऱयांपासून खासदारांच्या तोंडाला लागलेले मास्क, जागोजागी उभारलेले सॅनिटायझर स्टॅण्ड आणि मध्ये मोकळी जागा सोडून बसलेले खासदार यामुळे या अधिवेशनावर कोरोनाचे सावट असल्याचे सातत्याने जाणवत होते.
प्रश्नोत्तराचा तास रद्द का केला? काँग्रेसचा हल्लाबोल
प्रश्नोत्तराचा तास ही संसद सदस्यांची कवचकुंडले आहेत, मात्र सरकारने कोरोनाचे कारण सांगून प्रश्नोत्तराचा तासच रद्द केला आहे. हा खटाटोप कशासाठी? सरकार कशाला घाबरत आहे, असा सवाल करत काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांनी लोकसभेचे कामकाज सुरू होताच मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
कोरोनाच्या परिस्थितीमुळे ही व्यवस्था संरक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण
कोरोनाची भयंकर परिस्थिती ओढवल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचे पावसाळी अधिवेशन होत आहे. त्यामुळे संसदीय कामकाजात असे काही बदल करणे क्रमप्राप्त ठरल्याचे स्पष्टीकरण संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सभागृहाला दिले.
ड्रग्जमाफियांच्या मुसक्या आवळा
मुंबईत ड्रग्जमाफियांविरोधात एनसीबीने उघडलेल्या मोहिमेचा दाखला देत भाजपचे उत्तर प्रदेशातील गोरखपूरचे खासदार रवी किशन यांनी एनसीबी उत्तम काम करत असून देशातील ड्रग्जमाफियांच्या मुसक्या सरकारने आवळाव्यात, अशी आग्रही मागणी शून्य प्रहरात बोलताना केली.
देशात कोरोनाची स्थिती जगाच्या तुलनेत चांगली
जगभरात कोरोनाने घातलेला हैदास लक्षात घेता हिंदुस्थानात कोरोनावर आपण बऱयापैकी नियंत्रण मिळवले असून जगाच्या तुलनेत मृत्यूदरही कमी आहे. पुढील वर्षीच्या सुरुवातीपर्यंत देशात कोरोनावर लस येईल. या लसीची पहिली चाचणी मी स्वतःवर करणार आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज लोकसभेत जाहीर केले.
फौजिया खान यांच्यासह नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी
महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर निवडून गेलेल्या फौजिया खान यांच्यासह इतर सदस्यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. सभापती व्यंकय्या नायडू यांनी नवनिर्वाचित सदस्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
दोन्ही सभागृहांत शोकप्रस्ताव
माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह, लोकसभेचे विद्यमान सदस्य बसंतकुमार, राज्यसभेचे विद्यमान सदस्य अमरसिंह यांच्यासह अनेक मान्यवर दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली वाहून दोन्ही सभागृहांचे कामकाज काही वेळासाठी स्थगित करण्यात आले. लोकसभेत सभापती ओम् बिर्ला यांनी तर राज्यसभेत सभापती व्यंकय्या नायडू यांनी शोकप्रस्ताव मांडला. दोन मिनिटे शांतता बाळगून दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
खासदारांच्या पगारात वर्षभर 30 टक्के कपात
खासदारांच्या पगारात वर्षभरासाठी 30 टक्के कपात केली जाणार आहे. त्यासंदर्भातील विधेयक आज संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत सादर केले. या पगार कपातीसाठी संसद सदस्यांचे वेतन, भत्ते, निवृत्तीवेतन विधेयक 1954 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. या सुधारणा विधेयकाला 6 एप्रिल रोजी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती, असे प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.