आघाडीचे मंत्री आणि नेते स्वत:च्या तुंबड्या भरून घेत असताना नातेवाईकांच्या नावानेही पैसा ओरबडतायत – अतुल भातखळकर

 

सध्या तुरुंगवासी असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे नातेवाईक सत्यजीत देशमुख यांच्या इन्होवेव कंपनीला कोस्टल रोड आणि वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पाचे उप-सल्लागार बनवून गेल्या दोन वर्षात त्यांना ठाकरे सरकारने २० कोटींचे पेमेंट केले आहे. या कंपनीला शून्य अनुभव असताना सरकारने केलेली ही उधळण जनतेच्या पैशाची लूट असून भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी याविरुद्ध केंद्रीय दक्षता आयोगाकडे तक्रार केली आहे.

कोस्टल रोडच्या वाढत्या खर्चाबाबत अलिकडेच कॅगने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. वारेमाप लूट केल्यामुळे प्रकल्पाचा खर्च चौपट वाढला असून जनतेच्या पैशाची सत्ताधारी पक्ष वारेमाप लूट करीत आहेत. कॅगने याबाबत मुंबई महापालिकेला जाबही विचारला आहे.मंत्री आणि नेते स्वत:च्या तुंबड्या भरून घेत असताना नातेवाईकांच्या नावानेही पैसा ओरबाडत असून राज्याला खड्ड्यात घालत आहेत. या प्रकाराबाबत सविस्तर चौकशी करावी अशी मागणी भातखळकर यांनी केंद्रीय दक्षता आयोगाला पत्र लिहून केली आहे.

ठाकरे सरकारमध्ये सामील असलेल्या तिन्ही पक्षांच्या सामुहीक खाबूगिरीमुळे एका बाजूला प्रकल्पांचे खर्च प्रचंड वाढत असून दुसऱ्या बाजूला अनुभव नसलेल्या कंपन्यांमुळे प्रकल्प रेंगाळत आहेत, या प्रकरणात सखोल चौकशी झाल्यास भ्रष्टाचाऱ्यांचा पर्दाफाश होईल असे मत भातखळकर यांनी व्यक्त केले आहे.

Team Global News Marathi: