कोरोना वाढतोय, मास्क वापरा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

 

मुंबई | झपाटय़ाने वाढू लागलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आज राज्यातील जनतेला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करा, असे आवाहन केले. राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक गुरुवारी झाली. त्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली गेली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीनंतर ‘कोरोना अजूनही पूर्णपणे गेलेला नाही. रुग्णसंख्या वाढतेय. त्यामुळे प्रत्येकाने सतर्क रहा आणि काळजी घ्या. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करा,’ असे आवाहन केले. मास्कच्या वापराबरोबरच लसीकरणही महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आतापर्यंत 18 वर्षांवरील 92.27 टक्के नागरिकांनी प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे.

मुंबईत गुरुवारी तब्बल 350 रुग्ण सापडले. 11 फेब्रुवारीनंतरची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. बुधवारी 295 रुग्णांची नोंद झाली होती. मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आल्यानंतर 30 पर्यंत खाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून सरासरी 200 इतकी नोंदवली जात आहे. 10 मे रोजी मुंबईत केवळ 844 सक्रिय रुग्ण होते. 25 मे रोजी ही संख्या 1531 वर पोहोचली आहे. शिवाय रुग्णदुपटीचा कालावधी निम्म्याने घटून 6453 दिवसांवरून 3973 दिवसांवर आला आहे.

मुंबईत मार्च 2020 ला कोरोनाने शिरकाव केल्यानंतर काही दिवसांतच संपूर्ण मुंबईत शेकडो हॉटस्पॉट निर्माण झाले. त्यामुळे पालिकेसमोर आव्हान निर्माण झाले होते. मात्र पालिका प्रशासन आणि राज्य सरकारच्या प्रभावी लढय़ामुळे आतापर्यंत कोरोनाच्या तीन लाटा परतवून लावण्यात यश आले आहे. मात्र कोरोनाची तिसरी लाट संपूर्ण आटोक्यात आल्यानंतर सर्व निर्बंध उठवल्यानंतर गर्दी वाढल्याने रुग्णवाढ होत असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

Team Global News Marathi: