‘कोणाला तरी उभं केलं आणि…’, उद्धव ठाकरेंचा भाजप-मनसेवर घणाघाती टीका

 

अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली, पण तरीही यावरून सुरू असलेलं राजकारण काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये.भाजपने उमेदवार मागे घेतल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी भाजपसह राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. भाजपने अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, अशी मागणी करणारं पत्र राज ठाकरेंनी लिहिलं होतं, यावर उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने आपला उमेदवार मागे घेतला आहे. याबाबत बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजप आणि राज ठाकरेंवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले, की ‘कोणी विनंती करतंय काय? हे बघत होते. मग कोणाला तरी उभा करून विनंती करवून घेतली. म्हणजे विनंती करण्यासाठी विनंती केली गेली.तोंडावर आपटण्यापेक्षा पळालेले बरं, असं त्यांना वाटलं. मग माझं नाव आणि चिन्ह गोठवण्याची घाई का केली?’ असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.

अंधेरीच्या पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, अशी मागणी राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली, यानंतर शरद पवार यांनीही बिनविरोध निवडणूक व्हावी, अशी भावना व्यक्त केली. याशिवाय शिंदे गटही बिनविरोध निवडणुकीसाठी आग्रही होता. यानंतर भाजपने मुरजी पटेल हे त्यांचे उमेदवार मागे घेतले.

शिवसेना आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्यामुळे अंधेरीची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.

Team Global News Marathi: