कोल्हापूरात पावसाचा जोर पुन्हा वाढला पंचगंगेसह नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

 

कोल्हापूर जिह्याला गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने झोडपण्यास सुरुवात केली आहे. 24 तासांत पंचगंगेच्या पातळीत सहा फुटांची वाढ होऊन, एकूण 12 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिह्यातील राधानगरीसह सर्व प्रमुख धरणे व मध्यम, लघु प्रकल्प 80 ते 100 टक्के भरलेले आहेत. दरम्यान, गेल्या दोन आठवडय़ांपासून पावसाने दडी मारल्याने तसेच कडकडीत उन्हामुळे शेती पिके करपण्याच्या मार्गावर असल्याने बळीराजा चिंतातूर झाला होता.

मात्र, या पावसाने पिकांनाही तारल्याचे चित्र आहे. दरम्यान, सांगली जिह्यातील चांदोली धरण क्षेत्रात आणि महाबळेश्वर परिसरातही तुफान पाऊस सुरू आहे.
कोल्हापूर जिह्यात गेल्या चोवीस तासांत केवळ 2.3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. काल दिवसभरात जिह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 19.2 मि.मी. पावसाची नोंद झाली. 24 तासांत पंचगंगा नदीची पाणीपातळी आणखी 6 फुटाने वाढली असून, काल 14 फूट असलेली पंचगंगेची पातळी सायंकाळी चारच्या सुमारास 20 फूट झाली होती. तर, 12 बंधारे पाण्याखाली गेले होते.

कोल्हापूर जिह्यात 4 मोठे, 12 मध्यम, तर 60 लघु आणि एक उपसा सिंचन योजना असे एकूण 77 धरण प्रकल्प आहेत. राधानगरीसह प्रमुख धरणे सध्या 80 ते 100 टक्के भरली आहेत. गेल्या वर्षी 1 जून ते 7 ऑगस्ट या काळात राधानगरी धरण क्षेत्रात 2 हजार 461 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Team Global News Marathi: