कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा सोहळा दिमाखात साजरा

 

छत्रपतींची राजधानी असणाऱ्या करवीर नगरीत पारंपरिक विजयादशमीचा सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात दिमाखात साजरा झाला. श्री शाहू महाराज छत्रपती व संभाजीराजे छत्रपती यांच्या सहकार्याने, दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव यावर्षी भव्य स्वरुपात अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला.

दसरा सोहळ्यामध्ये श्री शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते शमीपूजन झाले. यानंतर छत्रपतींच्या कुटुंबातील युवराज संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती व यशस्विनीराजे छत्रपती यांनी सोने लुटताच करवीरवासियांनी अपूर्व उत्साहात सीमोल्लंघन करुन सोने लुटले.

तत्पूर्वी करवीर निवासिनी अंबाबाई(श्री महालक्ष्मी), जुन्या राजवाड्यातील तुळजाभवानी आणि गुरु महाराज यांच्या पालख्यांचे लवाजम्यासह आगमन झाले. यानंतर श्रीशाहू महाराज छत्रपती व कुंटुंबातील सदस्यांचे परंपरागत पध्दतीने ऐतिहासिक मेबॅक मोटारीतून दसरा चौकात आगमन झाले. यावेळी पोलीस विभाग व टी.ए. बटालियनच्या बँड पथकाने करवीर संस्थानचे गीत वाजवून त्यांचे स्वागत केले.

दसरा महोत्सव समितीच्यावतीने शाही कुटुंबातील सदस्यांचे स्वागत करण्यात आले. शाही घराण्याच्या प्रथेप्रमाणे औक्षण करण्यात आले. पारंपरिक पध्दतीने पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधीवत पूजा केल्यानंतर देवीची आरती करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांनी उत्साहात सोने लुटले. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्यासह राजघराण्यातील सदस्यांना नागरिकांनी त्यांना सोने दिले.

Team Global News Marathi: