कोल्हापूर विधानपरिषद : पुन्हा पाटील-महाडिक वाद पाहायला मिळणार !

 

कोल्हापूर | कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्याविरुद्ध भाजपने अखेर महाडिक कुटुंबातील अमल महाडिक यांनाच मैदानात उतरवले आहे. दोघेही उमेदवार पुन्हा आमने-सामने आल्याने जोरदार लढत होऊन निवडणुकीची रंगत वाढणार आहे. काँग्रेस व भाजपकडून विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. परिणामी, अमल महाडिक हे पराभवाचा बदला घेणार की सतेज पाटील विजयाची पुनरावृत्ती करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

२०१४ मध्ये तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना अमल महाडिक यांनी अवघ्या २२ दिवसांत प्रचार करून परावभाव दाखवला होता. काही महिन्यांतच झालेल्या विधानपरिषेद निवडणुकीत सतेज पाटील यांनी अमल यांचे वडील व तत्कालीन विधान परिषदेचे आमदार महादेवराव महाडिक यांचा पराभव करून उट्टे काढले होते. २०१९ मध्ये सतेज पाटील यांच्या पराभवाचा बदला त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी घेतला. राजकारणात नव्याने प्रवेश केलेल्या ऋतुराज यांनी मोठे मताधिक्य घेतल्याने अमल महाडिक यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या साथीने महाडिक यांच्या ताब्यातील संस्था ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे. सद्य:स्थितीत महाडिकांच्या ताब्यातील महत्त्वपूर्ण गोकुळवर पालकमंत्री पाटील यांनी वर्चस्व मिळवले आहे. सतेज पाटील व महाडिक कुटुंबीय यांच्यात प्रचंड ईर्ष्येचे आणि टोकाचे राजकारण सुरू आहे. आता अमल यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याने २०१४ मधील विजयाची पुनरावृत्ती होणार का की येणाऱ्या निवडणुकीत २०१९ सारखा पराभव पाहावा लागणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Team Global News Marathi: