खायचं, लोकसंख्या वाढवायची ही कामे जनावरेही करतात, मोहन भागवत यांचे वादग्रस्त विधान

 

राष्ट्रसंघाच्या अहवालानंतर देशातील लोकसंख्या वाढीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. याचदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी वादग्रस्त विधान केले. फक्त खायचं आणि लोकसंख्या वाढवायची ही कामे तर जनावरेसुद्धा करतात. हा मानवधर्म नाही. दुर्बलांचे रक्षण करणे हा खरा मनुष्यधर्म आहे, असे सरसंघचालक भागवत म्हणाले. कर्नाटकमधील चिक्कबल्लापूर येथे श्री सत्य साई विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षान्त समारंभात भागवत बोलत होते.

यावेळी त्यांनी देशातील लोकसंख्या वाढीच्या वेगावर मोठे विधान केले. लोकसंख्या वाढवून केवळ खायचं हे काम तर जनावरेसुद्धा करतात. जनावरांना जंगलात टिकून राहण्यासाठी या गोष्टी आवश्यक असतात. ताकदवान टिकेल हा जंगलाचा नियम आहे. माणसांमध्ये असे घडत नाही. जेव्हा ताकदवान व्यक्ती दुसऱयाचे रक्षण करतो तेव्हा ते मानवतेचे लक्षण असते, असे सरसंघचालक म्हणाले.

भारताने अलीकडे खूप प्रगती केली आहे. देशवासीयांनी विकास पाहिला आहे. आपण इतिहासातून धडा घेत भविष्याकडे बघून विकास केला आहे. कोणी 10-12 वर्षांपूर्वी असे बोलले असते तर ते गांभीर्याने घेतले नसते. देशातील आजच्या विकासाचा पाया खरंतर 1857 मध्येच रचला गेला होता, असा दावा त्यांनी केला. जर कोणाची भाषा, धर्म अन् देशही वेगळा असेल तर ते वादाचे मूळ आहे, असे ते म्हणाले.

Team Global News Marathi: