‘खोके’ सरकारला शेतकऱ्यांची ही दैना दिसेल काय? सामना अग्रलेखातून टोला

 

उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून शिंदे आणि फडणवीस सरकारला धारेवर धरले. यंदाचा पावसाळा राज्यातील शेतकऱ्यांच्या मुळावरच उठला आहे. आधी जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले. या धक्क्यातून शेतकरी अजून सावरले नसतानाच आता परतीच्या पावसानेही शेतकऱ्यांचा मोठाच घात केला. गेले 10-12 दिवस राज्याच्या सर्वच भागांत पावसाने धुमाकूळ घातला.

पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्याची भरपाई कुठल्याही परिस्थितीत पोळ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करू अशी गर्जना राज्यातील ‘मिंधे’ सरकारने केली होती. पोळा होऊन दीड महिना झाला तरी अजून कागदी घोडेच नाचवले जात आहेत. पोटनिवडणुकीच्या व्यूहरचनेत आणि कटकारस्थानात अडकून पडलेल्या ‘खोके’ सरकारला शेतकऱ्यांची ही दैना दिसेल काय? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून शिंदे आणि भाजप सरकारला विचारला आहे.

उद्धव ठाकरे यांनी अग्रलेखात म्हटले की, सततच्या या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना शेतात पाऊलही ठेवता येत नाही. डोळ्यासमोर शेतातील पिकांची नासाडी होत असताना मिळेल ते वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात पाऊल ठेवले तरी गुडघाभर चिखलात पाय रुतून बसत असल्याने शेतकरी वर्गावर बिकट परिस्थिती ओढवली आहे. ही भयंकर स्थिती विदर्भ, मराठवाडय़ातील अनेक जिल्ह्यांत दिसते आहे. शेतात उभ्या असलेल्या आणि कापणीला आलेल्या पिकांचे जे अतोनात नुकसान डोळ्यासमोर दिसते आहे ते शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आहे, असे उद्धव ठाकरे अग्रलेखात म्हणाले आहेत.

Team Global News Marathi: