केतकी चितळेवरील सर्व गुन्हे कोर्टाने केले एकत्र; पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरण

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यासंदर्भात अभिनेत्री केतकी चितळे व नाशिकचा विद्यार्थी निखिल भामरे यांच्यावर नोंदविण्यात आलेले सर्व गुन्हे उच्च न्यायालयाने सोमवारी एकत्रित केले. या दोघांवर सगळ्यात आधी ज्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आले तिथे सर्व गुन्हे वर्ग करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. आक्षेपार्ह पोस्टबद्दल केतकीला १४ मे रोजी पोलिसांनी अटक केली होती. जूनमध्ये तिची जामिनावर सुटका झाली.

केतकीविरोधात २२ गुन्हे नोंदविण्यात आले असून निखिल भामरेवर सहा गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. न्या. नितीन जामदार व न्या. नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने केतकीविरोधातील सर्व गुन्हे ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात तर निखिलविरोधातील गुन्हे नौपाडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्याचे निर्देश दिले.

दरम्यान , चितळे व भामरे यांनी आपल्याला चुकीने अटक केल्याबद्दल नुकसानभरपाई देण्यात यावी व आपली अटक बेकायदेशीर असल्याचे जाहीर करावे, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे. त्यांच्या या मागण्यांवर उच्च न्यायालयाने राज्य सरकार व सर्व तक्रारदारांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिककर्त्यांच्या या मागण्यांवर राज्य सरकारची काय भूमिका आहे? याबाबत सरकार व तक्रारदारांनी प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे म्हणत न्यायालयाने या दोघांच्या याचिकांवरील सुनावणी ६ सप्टेंबर रोजी ठेवली आहे.vvvvvvvv

Team Global News Marathi: