काय झाडी काय डोंगर या डॉयलॉग नंतर आता ४० गद्दार थाळी आणि ५० खोके एकदम ओके थाळीने लक्ष वेधलं 

आज बाजारात वस्तू विकण्यासाठी मार्केटिंगची मोठी गरज लागते तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जातात. मार्केटिंगसाठी काय पण हे आपण नेहमीच पाहत आलो आहोत. अशीच एक भन्नाट कल्पना कट्टर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने मार्केटमध्ये आणली आहे. सोलापुरातील शिवसेना पदाधिकाऱ्याने दोन थाळ्या ग्राहकांसाठी आणल्या.
या थाळ्यांची नावं ऐकली तर नक्कीच त्याबद्दल उत्सुकता निर्माण होईल. कारण या थाळ्या राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरुन प्रेरित आहेत. यातील एका थाळीचं नाव आहे ‘४० गद्दार’ तर दुसऱ्या थाळीचं नाव आहे ‘५० खोके एकदम ओके’. यातील ‘४० गद्दार’ ही शाकाहारी तर ‘५० खोके एकदम ओके’ ही मांसाहारी थाळी आहे.
पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे हॉटेल शिवम इथे या भन्नाट नावाच्या थाळ्या जेवणासाठी ठेवण्यात आल्या आहेत. ’40 गद्दार’ थाळी ही अवघ्या 40 रुपयांना तर ‘५० खोके एकदम ओके’ ही मांसाहारी थाळी फक्त ५० रुपयात ठेवण्यात आली आहे. राज्यामध्ये आतापर्यंत बुलेट थाळी, बाहुबली थाळी अशा अनेक थाळ्या प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु आता राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर आलेल्या या दोन थाळ्या सध्या सर्वत्र चर्चेत येऊ लागल्या आहेत.
राज्यात सत्तांतर झाले. यानंतर शिवसेनेकडून शिंदे गटाच्या आमदारांना सातत्याने गद्दार म्हणून हिणवले गेले. याच 40 आमदारांच्या नावाने ’40 गद्दार’ ही शाकाहारी थाळी तयार झाली. तर विधानसभेच्या आवारात ’50 खोके एकदम ओके’ नावाने झालेल्या घोषणावरुन अनोखी मांसाहारी थाळी तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्यातील वेगवेगळ्या थाळ्यांमध्ये शिवसेनेची ’40 गद्दार’ थाळी आणि ’50 खोके एकदम ओके’ थाळी निश्चितच चर्चेचा विषय ठरत आहे.

 

Team Global News Marathi: