काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेवरून राहुल गांधींची केंद्र सरकारवर जोरदार टीका

 

काही दिवसांपासून काश्मीरी पंडितांवर हल्ले होण्याचं प्रमाण वाढलं आहे. दहशतवाद्यांनी अनेक हिंदू आणि काश्मीर पंडितांची हत्या केली आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ज्यांना सुरक्षा करायची आहे ते चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

बँक मॅनेजर, शिक्षक आणि अनेक निष्पाप लोक रोज मारले जात आहेत. काश्मीरी पंडित पलायन करत आहेत. ज्यांना देशाची सुरक्षा करायची आहे त्यांना चित्रपटाच्या प्रमोशनमधून वेळ मिळत नाही. भाजपने काश्मीरला केवळ सत्तेची सिडी बनवले आहे काश्मीरमध्ये शांतता कायम राखण्यासाठी पंतप्रधानांनी त्वरित पावले उचलावीत, असं आवाहन राहुल गांधींनी केलं आहे. राहुल गांधींनी अप्रत्यक्षरित्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला आहे. बुधवारी अमित शहांनी अभिनेता अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज हा चित्रपट पाहिला होता.

दरम्यान, काश्मीरी पंडितांच्या सुरक्षेवरून राहुल गांधींनी भाजपवर यापुर्वीही टीका केली होती. काश्मीरमध्ये गेल्या पाच महिन्यांमध्ये 15 सुरक्षाकर्मी शहिद झाले आणि 18 नागरिकांची हत्या करण्यात आली. 18 दिवसांपासून काश्मीरी पंडित पिडित आहेत. भाजप 8 वर्षांचा उत्सव साजरा करण्यात व्यस्त आहे. ही कोणतीही फिल्म नसून एक सत्य आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते.

Team Global News Marathi: