कार्तिकी “महापूजेला विरोध दर्शवणारे वारकरी नसून संघाचे चमचे”

अकोलाः महापूजेला विरोध करणारे वारकरी नसून संघाचे चमचे आहेत. वारकऱ्यांच्या नावाखाली पूजेला विरोध करणाऱ्या या भाजप कंपनीपासून वारकऱ्यांनी सावध असावे, असं टीकास्त्र राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी सोडलं आहे. ट्विट करत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

उपमुख्यमंत्र्यांचा कार्तिकी एकादशीच्या श्रीविठ्ठल महापूजेला विरोध करणारे वारकरी नसून संघाचे चमचे आहेत. वारकऱ्यांच्या नावाखाली विठ्ठल पूजेला विरोध करणाऱ्या या भाजपा कंपनीपासून वारकऱ्यांनी सावध असावे. “तुका म्हणे खळ l करू समयी निर्मळ ll, असा टोलाही मिटकरींनी कथित वारकऱ्यांना लगावला आहे.

दुसरीकडे यंदाच्या कार्तिकी यात्रेनिमित्त निघणाऱ्या दिंड्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. नुकतंच पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. कार्तिकी शुद्ध एकादशीच्या निमित्त महाराष्ट्रातील जिल्ह्यातून यंदाही पंढरपूर येथे दिंड्या दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र यंदा देवस्थानात करायचे नित्योपचार मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन होणार आहे. त्यामुळ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यातून दिंड्या पंढरपुरात दाखल होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. तसेच त्या स्तरावर तात्काळ कार्यवाही करावी, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

कार्तिकी यात्रेचा कालावधी येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत राहणार आहेत. कार्तिकी शुद्ध एकादशी यात्रेनिमित्त राज्यातील विविध जिल्ह्यांतून यावर्षीही दिंड्या पंढरपूर येथे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण कार्तिकी एकादशीनिमित्त देवस्थानात नित्योपचार कोरोनाबाबत मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करुन होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातून दिंड्या निघणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी आदेशात नमूद केलं होतं.

ग्लोबल न्युज नेटवर्क: