कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचे वैचारिक विकासासाठी उपक्रम

कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचे वैचारिक विकासासाठी उपक्रम

– प्रा. डॉ. व्ही. पी. शिखरे
शिक्षण शास्त्र महाविद्यालय, बार्शी

बार्शी :

४ फेब्रुवारी हा दिवस बार्शी आणि उस्मानाबाद परिसरात समाज दिन म्हणून साजरा केला जातो . संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज ,महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ‌. पंजाबराव देशमुख यांच्या विचाराने प्रेरित होऊन, त्यांचा समाज विकासाचा वसा पुढे चालू ठेवण्यासाठी बार्शी आणि उस्मानाबाद परिसरात कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवून समाजातील गोरगरीब, दीनदलित, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी हा वारसा पुढे चालू ठेवला आहे. कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करावयाचा होता, जे की शिक्षण प्रक्रियेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

फक्त पोपटपंची परीक्षार्थी विद्यार्थी न बनता, आपला विद्यार्थी एक सुजाण नागरिक बनला पाहिजे, यासाठी मामांची विशेष धडपड होती. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्यांचा वैचारिक विकास झाला पाहिजे ,यासाठी मामा खूपच जागृत होते. विद्यार्थ्यांच्या वैचारिक विकास साधण्यासाठी मामा दरवर्षी आपल्या संस्थेत व्याख्यानमाला आयोजित करीत असत. या व्याख्यानमालेची विविध पुष्पे, विविध भागातील परिवर्तनशील विचारप्रवर्तक भाषणे देणाऱ्या वक्त्या मार्फत गुंफली जात .

एवढे करून मामा थांबत नसत, तर आपल्या बोर्डिंग मधील विद्यार्थी देखील चांगले वक्ते बनले पाहिजेत, यासाठी विशेष प्रयत्न करत असत. आपल्या बोर्डिंग मधील विद्यार्थ्यांनी आपले विचार एका विशिष्ट शैलीत मांडण्यासाठी त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्याचं काम देखील मामानी केलेले दिसून येते. हाच विचारांचा धागा पकडून, आज देखील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी परिवारातील शिवशक्ती अर्बन बँकेमार्फत व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते आणि यासाठी बँकेचे चेअरमन डॉ. प्रकाश बुरगुटे व त्यांचे संचालक मंडळ प्रयत्नशील आहे.

मामांनी व्याख्यानमालेचे आयोजन केल्याचे फलित म्हणून त्याकाळी बोर्डिंग मधील विद्यार्थ्यांनी पुणे येथे वसंत व्याख्यानमालेत सहभाग नोंदवून बक्षिसे पटकावली होती. यामध्ये श्री नवनाथ बारस्कर, श्री गोविंदराव बुरगुटे , पानगाव चे श्री एन डी पाटील , अँड. आदिनाथ यादव, श्री एस एम पाटील इत्यादीचा समावेश होता. सदर विद्यार्थ्यांची भाषणे त्याकाळी इतकी प्रभावी व्हायचे की समोरील श्रोतृवर्ग मंत्रमुग्ध होऊन जात असे. त्यांच्या भाषणाचे विषय देखील साधे सोपे नव्हते, तर ते समाज परिवर्तनाला अनुसरुन असायचे.

यामध्ये महात्मा गांधी ,छत्रपती शिवाजी महाराज ,राजश्री शाहू महाराज ,महात्मा फुले , लोकमान्य टिळक इत्यादी थोर व्यक्तींच्या कार्यावर आणि जीवन मुल्यावर बोर्डिंग मधील हे वक्ते विद्यार्थी विचार मांडत असत. त्यातून समाजातील बरेच तरुण प्रेरित होत असत आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल झालेला दिसून येत असे. अगदी अलीकडचे उदाहरण घ्यायचे झाले तर ,आमदार गोविंदराव बुरगुटे यांचं उदाहरण घेता येईल. त्यांच्या भाषणातून समोरील जनसमुदाय मंत्रमुग्ध होऊन जात असे .

बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले या उक्तीप्रमाणे त्यांनी आपले कार्य देखील जोमाने चालू ठेवले होते. कर्मवीर मामांच्या आशीर्वादानेच त्यांनी त्या काळी समाज विकास साधला होता. कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या या वैचारिक विकास उपक्रमातून बोर्डिंग मधील विद्यार्थी आपले विचार सुस्पष्ट आणि समाज परिवर्तनाला साद घालणारे व्यक्त करीत असत. संस्थेतील मुलांची वैचारिक कुवत वाढावी व समाजात मुलांचा प्रभाव पडावा म्हणून पूज्य मामा अगदी सुरुवातीपासून प्रयत्न करीत होते. सरड्याची धाव कुंपणापर्यंत अशी म्हण आहे त्याप्रमाणे मुलांचा प्रभाव फक्त बार्शी परिसरात न राहता तो देशभर पडावा म्हणून पूज्य मामानी मुलांची वैचारिक कुवत वाढवण्यासाठी अगदी खर्च करून प्रयत्न केलेले दिसून येतात .

यामुळे बौद्धिक दृष्ट्या उच्च व सखोल अशी चौरस प्रभावी विचारसरणी मुलांमध्ये निर्माण झाली आणि यामुळेच बोर्डिंग मधील काही विद्यार्थी जाहीर सभेत अति उत्तम भाषणे करु लागली होती . पूज्य महात्मा गांधी यांच्या विचारांचा देखील प्रभाव मामांवर पडलेला होता. तोच सकारात्मक प्रभाव आपल्या बोर्डिंग मधील मुलावर हि पडावा म्हणुन मामाने ग्रंथालयात मुलांसाठी खास सोय केलेली होती. एकदा पूज्य महात्मा गांधी पुण्यातील एका सभेत प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते, त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचावेत यासाठी मामांनी बोर्डिंग मधील काही विद्यार्थी महात्मा गांधींच्या सभेसाठी संस्थेच्या खर्चाने पुण्याला पाठवली होती. आतासारखी अत्याधुनिक साधने त्यावेळी उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रत्यक्ष हजर राहून सभा ऐकावी लागत असे.

अशा खडतर काळात देखील संस्थेकडे अतिशय कमी पैसा उपलब्ध असूनही फक्त विद्यार्थ्यांचा वैचारिक विकास व्हावा या उदात्त हेतूने मामा आपल्या बोर्डिंग मधील मुलांसाठी खर्च करून प्रामाणिक प्रयत्न करत होते. मामा म्हणत असत, शिक्षणाने पुढारी निर्माण नाही झाला तरी चालेल , पण सज्जन माणूस निर्माण झाला पाहिजे .समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा वर आघात करून नवा समाज निर्माण करण्याचे काम आपल्या बोर्डिंग मधील विद्यार्थ्यांनी केले पाहिजे . तसेच हुंडा पद्धती बंद पाडली पाहिजे, गरिबांची तसेच सामान्य जनतेची सावकाराकडून होणारी पिळवणूक थांबली पाहिजे आणि हे सर्व कार्य करायचे असेल तर आपल्या बोर्डिंग मधील विद्यार्थी हा विचाराने पक्का आणि ध्येयाने प्रेरित झाला पाहिजे.
पूज्य मामांचे शिक्षण परिस्थिती अभावी जास्त झाले नव्हते.

मामांनी बार्शी पालिकेत कारकुनाची नोकरी स्वीकारली होती. त्यामुळे मनी इच्छा असूनही पुढचे उच्च शिक्षण मामांना घेता आले नव्हते .असे असूनही आजच्या उच्चविद्याविभूषित व्यक्तींना लाजवेल इतके वाचन मामांचे होते . वाचाल तर वाचाल या उक्तीचे महत्त्व मामाने दूरदृष्टीने लवकरच ओळखले होते. वाचनातून समाज परिवर्तनाला आवश्यक असणारी वैचारिक बैठक प्राप्त होते हे मामाने पुरेपूर जाणले होते. वाचनातून आपण काय करावे आणि काय करू नये हे लक्षात येते .

इतिहासात घडलेल्या अनेक महापुरुषांची चरित्रे वाचल्यावर लक्षात येते की, त्यांच्याही आयुष्यात एखादे पुस्तक वाचनात आल्याने त्यांच्या वर्तनात अमुलाग्र बदल होऊन त्यांच्या हातून मोठे समाज विधायक कार्य घडले आहे . म्हणून आपल्या विद्यार्थ्यांनी नियमित वाचन केले पाहिजे, असे मामांना वाटे. जर आपले विद्यार्थी वाचक बनवायचे असतील तर आपल्यालाही त्यांच्यासमोर तशाप्रकारचा आदर्श निर्माण करावा लागेल आणि म्हणून मामा नेहमी वर्तमानपत्रे , पुस्तके, तुकाराम गाथा यासारखे ग्रंथ नेहमी वाचत असत.

त्यातील महत्त्वाच्या बाबी अधोरेखित करीत असत. आणि त्यातून आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कोणते मुल्ये रुजवता येईल याचा विचार करून ते मूल्य रुजविण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने मामा प्रयत्न करीत असत .मामांना सर्वात जास्त संत तुकाराम यांची गाथा व महात्मा गांधी यांचे माझे सत्याचे प्रयोग ही दोन पुस्तके खूपच आवडत. या पुस्तकांचे वाचन मामा ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी अगदी तन्मयतेने करीत असत. मामा संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा गांधी यांचे निस्सीम भक्त होते .

या शिवाय महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा देखील प्रभाव मामावर पडलेला होता . उपरोक्त समाजसुधारकांबाबतचे कोणतेही लिखाण वर्तमानपत्रातून अथवा मासिकातून प्रसिद्ध झाले तर ते पूज्य मामा ती माहिती आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड करीत असत. या लिखाणातून एखादा बोध घेऊन आपणालाही काही करता येईल का ? याचा देखील विचार मामा सतत करीत असत. मामा फक्त विचार करून थांबत नसत, तर तो विचार लवकरात लवकर अंमलात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असत. आपण संस्थेसाठी आहोत, ही भावना मनात ठेवली पाहिजे .

संस्थेचा जिवंतपणा माणसांच्या जिवंतपणा वर अवलंबून असतो. आणि म्हणून संस्थेचा विकास करण्यासाठी आपण सर्वांनी झटावे. निधीची पर्वा करू नये, असे मामांना नेहमी वाटत असे.

आज देखील मामांचा हाच विचारांचा वारसा घेऊन संस्था समाज विकासासाठी डॉ. बी. वाय. यादव यांच्या नेतृत्वात कार्य करीत आहे .हा जगन्नाथाचा रथ असाच समाजातील धुरीनांच्या साथीने घौडदौड करीत राहू दे, हीच भगवंत चरणी प्रार्थना.

ग्लोबल न्युज नेटवर्क: