कानडी सरकारची दडपशाही, महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदीच्या हालचाली

 

बेळगाव| सीमाभागात मराठी भाषिकांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱया महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी आणण्यासाठी कर्नाटक सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याबाबत विधानसभेत बोलताना कायद्याच्या चौकटीत चौकशी करून याबाबत निर्णय घेतला जाईल, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज स्पष्ट केले. बेळगाव सुवर्ण विधानसौंध परिसरात वीरराणी कित्तूर चन्नम्मा आणि क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांचे पुतळे उभारण्यासह या पुतळ्यांचा अवमान करणाऱयांवर देशद्रोहाचा खटला दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

कर्नाटक सरकारच्या बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनाला लोकशाही मार्गाने विरोध करण्यासाठी महामेळाव्यात एकत्र आलेल्या मराठी भाषिकांचा आवाज दडपण्यासाठी कानडी पोलिसांच्या बंदोबस्तातच ‘कन्नड रक्षण वेदिका’च्या मूठभर गुंडांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर काळी शाई फेकून मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता.

या प्रकरणाचे संतप्त पडसाद सीमाभागासह महाराष्ट्रात उमटले होते. यावेळी कोल्हापुरात शिवसैनिकांनी ‘कन्नड रक्षण वेदिका’ संघटनेचा लाल-पिवळा ध्वज जाळून निषेध नोंदविला होता. या प्रकरणासह सध्या झालेल्या संगोळ्ळी रायण्णा पुतळ्याच्या अवमानाबाबत अधिवेशनात आज चर्चा झाली. त्यावेळी सभागृहात बोलताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीवरच बंदी घालण्याचे संकेत दिले.

यावेळी चर्चेत सहभागी होताना विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी, ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांचे देशासाठीचे योगदान खूप मोठे आहे,’ असे सांगितले. यावेळी सिद्धरामय्या यांनी सातत्याने कन्नड लोकांचा अवमान करणाऱया महाराष्ट्र एकीकरण समितीवर नियंत्रण ठेवून त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे असल्याची मागणी केली.

Team Global News Marathi: