शरद पवारांचा निष्ठावान असलो तरी उद्धव ठाकरेंचा भगवा महापालिकेवर फडकवणारच आव्हाडांची गर्जना

ठाणे :- मी जरी काँग्रेसी विचारांचा असलो आणि शरद पवारांचा निष्ठावान कार्यकर्ता असलो तरी या ठाणे महापालिकेवर उद्धव ठाकरे यांचा भगवा फडकवू, हा आमचा शब्द आहे, असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार राजन विचारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जाहीर कार्यक्रमात आव्हाड बोलत होते.

आगामी काळात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. विधानसभेवर महाविकास आघाडीचाच झेंडा फडकवू, असे प्रतिपादन आव्हाड यांनी केल्याने ठाण्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
खासदार राजन विचारे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड व ठाणे काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. विक्रांत चव्हाण यांनी काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात हजेरी लावली होती. यावेळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
महाराष्ट्रातील जनता ही प्रेमळ आहे. पण सह्याद्रीच्या कड्यासारखी कठीणही आहे. भविष्यात आगामी निवडणुकांचे बिगुल वाजेल तेव्हा पैशांचा पाऊस पडेल, अशी धडकी ठाणेकरांच्या मनात आहे. पण भावना इतक्या उसळलेल्या आहेत की, त्यातून जो ज्वालामुखी पेटेल त्यात पैशांचा पाऊस वारे सगळे भस्म होतील, असा माझा विश्वास असल्याचे आव्हाड यांनी नमूद केले.

उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला अन् म्हणाले…

शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती खालावली होती. त्यावेळी शस्त्रक्रिया होण्याआधी त्यांनी काही लोकांना फोनद्वारे संपर्क साधला. त्यात मलादेखील त्यांनी फोन केला आणि म्हणाले, मी शस्त्रक्रियेसाठी चाललो आहे. मंत्रिमंडळ आणि महाराष्ट्राच्या एकंदर परिस्थितीची तुम्ही सगळ्यांनी मिळून काळजी घ्या, असे सांगून ते शस्त्रक्रियेला गेले, एवढा विश्वास ठेवून उद्धव ठाकरे रुग्णालयात गेले आणि त्यांना अखेरीस काय पाहायला मिळाले, असेही आव्हाड यांनी नमूद केले.

Team Global: