जयंत पाटलांच निलंबना विरोधात राष्ट्रवादी आज राज्यभर करणार आंदोलन

 

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे.विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरल्यामुळं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. जयंत पाटलांच्या निलंबनाच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आज रस्त्यावर उतरणार आहे. आज राज्यभरात निषेध आंदोलन केलं जाणार आहे.

दरम्यान, काल जयंत पाटील यांच्या निलंबनानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेत जल्लोषच केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. ‘आठ दिवस असेच जातील जयंत पाटील पुन्हा येतील…’ ‘हम मे है दम,करेक्ट कार्यक्रम करेंगे हम’ अशा घोषणा यावेळी विरोधकांनी दिल्या होत्या. काल बीड जिल्ह्यातील शिरूर कासार इथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मोठ्या संख्येने लोकांनी रस्त्यावर येऊन जयंत पाटलांच्या निलंबनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचाही निषेध करण्यात आला.

निलंबनाच्या घोषणेनंतर जयंत पाटलांनी ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला आहे. या निर्लज्ज ‘सरकार’ विरोधात लढत राहणार. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय…! असं दोन ओळींचं ट्वीट जयंत पाटलांनी केलं आहे. मला निलंबित केलं तरी राज्यातील तरुणांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, महिलांच्या प्रश्नांसाठी मी लढतच राहणार असल्याचं ते म्हणाले.

Team Global News Marathi: