जन आशीर्वाद जत्रेतले अर्धे मंत्री हे विचार आणि आचाराने उपरे किंवा बाटगे – संजय राऊत

 

मुंबई | राज्यात नाही तर देशात पुन्हा भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन करण्यासाठी नवनिर्वाचित केंद्रीय मंत्र्यांकडून विविध जिल्यांचा दौरा करून जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेमध्ये सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये स्थानिक सरकारच्या उणीवा दाखवत मोदी सरकार’च उदो-उदो करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर आणि नवनिर्वाचित मंत्र्यांवर तोफ डागली आहे.

मोदी सरकारने सध्या त्यांच्या मंत्र्यांची एक जन आशीर्वाद ‘जत्रा’ सुरु केली आहे. त्या जत्रेत फक्त विरोधकांविरोधात शिव्याशाप देण्याचेच काम सुरु आहे. या जन आशीर्वाद जत्रेतले अर्धे मंत्री हे विचार व आचाराने उपरे किंवा बाटगे आहेत. म्हणजे काल-परवा भाजपात घुसले व मंत्रीपदाची हळद लावून बोहल्यावर चढले. हे उपरे भाजपचा प्रचार करीत फिरत आहेत व वर्षानुवर्षे भाजपच्या पालख्या उचलणारे कार्यकर्ते त्या ‘जत्रे’त येड्याखुळ्यासारखे सामील झाले आहेत, अशी एक गंमत महाराष्ट्रासह देशभरात सुरु असताना विरोधी पक्षांना अधिक विचाराने पावले टाकावी लागतील.

१९ राजकीय पक्ष एकत्र आल्याने लगेच मोदींचे सरकार डळमळीत झाले व गेले या भ्रमात राहता येणार नाही. कारण या एकोणिसात अनेक पक्ष असे आहेत की, त्यांचे ओसाड पडके वाडे झाले आहेत. या पडक्या वाड्यांची डागडुजी करुन त्यांना बरे स्वरुप दिल्याशिवाय एकजुटीचे धक्के समोरच्यांना बसणार नाहीत. विरोधकांच्या एकजुटीचे प्रदर्शन करताना त्याची तटबंदी ढिसाळ पायावर असता कामा नये असे त्यांनी म्हंटले आहे.

Team Global News Marathi: