युती केली हेच चुकलं | अन्यथा विधानसभाला १५० जागांच्या पुढे गेलो असतो – फडणवीस

युती केली हेच चुकलं | अन्यथा विधानसभाला १५० जागांच्या पुढे गेलो असतो – फडणवीस

मुंबई, १९ सप्टेंबर : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करून चूक केली, जर स्वतंत्र लढलो असतो तर १५० पेक्षा जास्त जागा आल्या असत्या, असा दावा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताह कार्यक्रमात फडणवीस यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं आहे. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या भाकीताचा संदर्भ देत फडणवीस यांनी युती करून चूक केल्याची कबुली अप्रत्यक्षपणे दिली आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?
“भाऊ तोरसेकर यांनी २०१३ मध्ये सांगितलं होतं की भाजपाने नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून निवडलं तर संपूर्ण बहुमत २७२+ जागा भाजपाला मिळतील. त्यावेळी भाऊ तोरसेकर अशक्य वाटणारा अंदाज बांधत आहेत असं अनेकांना वाटलं. मात्र त्यांचं ते भाकित खरं ठरलं. २०१९ मध्येही काहिशी अस्थिरता होती. त्यावेळीही भाऊ म्हणाले होते की ३००+ जागा येतील. लोकसभा निवडणुकीत तेच घडलं.

त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळीही त्यांनी एक पुस्तक लिहून भाजपाला पर्याय दिले होते. भाजपा १५०+ किंवा युती २००+ त्यावेळी आपण युतीचा पर्याय निवडला. तो पर्याय निवडला नसता तर तोरसेकर यांचं तिसरं भाकित खरं ठरलं असतं. आपण मोदींच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रात १५०+ जागा जिंकल्या असत्या. युती केली हीच चूक झाली ” असं फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली आहे. ‘ही पश्चातबुद्धी आहे, हे त्यांनी ठरवलं पाहिजे होतं, आता त्यांना सगळी गणितं सुचत आहेत, यावर आम्ही काय बोलणार?’, असं शिवसेना नेते अनिल परब म्हणाले आहेत.

मागच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागांवर विजय मिळाला. भाजप आणि शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं असतानाही मुख्यमंत्रीपदावरुन या दोन्ही पक्षांनी फारकत घेतली. महाराष्ट्रात रंगलेल्या सत्ता नाट्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सगळ्यांना धक्का देत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण अवघ्या तीन दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: