स्वतःचं मूल अशा पद्धतीने जाणं हे अत्यंत हृदयद्रावक आहे – मुख्यमंत्री
भंडारा जिल्हा रुग्णालयास लागलेल्या आगीत आपली बाळं गमावलेल्या मातांच्या सांत्वनासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी स्वतः भोजापूर गावातील सोनझारी वस्तीत आले होते. अशा भीषण दुःखाच्या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रच जणू आपल्या पाठीशी असल्याचा दिलासा त्या मातांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः भेटून दिला होता.
भंडारा येथील या भीषण घटनेत भोजापूर जवळच्या सोनझारी येथील गीता बेहरे यांची अवघ्या महिनाभराची मुलगी दगावली. शहराजवळ असलेल्या भोजापूर गावातील सोनझारी ही पाचसहाशेची वस्ती. या वस्तीत बेहरे कुटुंबीय राहतात. मोलमजुरी करून ते आपले घर चालवतात.
तर गीता आणि विश्वनाथ यांचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता. मृत बालिका हे त्यांचे पहिलेच अपत्य. जन्मत:च बाळाचे वजन अत्यंत कमी असल्याने तिला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु केंद्रात दाखल करण्यात आले होते. तेथे गेले दोन महिने तिच्यावर उपचार सुरू होते. चांगल्या उपचारांमुळे तिच्या प्रकृतीत सुधारणाही झाली होती.
मात्र शनिवारी पहाटे आलेल्या त्या दुर्दैवी निरोपाने सर्वस्व हिरावले गेल्याची अत्यंत दुःखद जाणीव यांना झाली. त्यांना फार मोठा मानसिक धक्का बसला आहे.या घटनेमुळे अत्यंत व्यथित झालेले मुख्यमंत्री रविवारी तातडीने भंडारा येथे दाखल झाले. भोजापूर गावातील सोनझारी वस्तीत येऊन त्यांनी दोन्ही मातांची भेट घेतली. त्यांची वेदना ऐकून काही क्षण ते निःशब्द झाले .जिल्हाधिकाऱ्यांनी या कुटुंबांची सर्वतोपरी काळजी घ्यावी असे आदेश त्यांनी यावेळी दिले.