खरंच कोरोना आहे तरी काहो? वाचा काय आहे वास्तव

खरंच कोरोना आहे तरी काहो? वाचा काय आहे वास्तव

‘खरंच कोरोना आहे तरी काहो? मला तर वाटतं सगळं राजकारणच आहे बा’ काल एके ठिकाणी एक भोळ्या भाबड्या अनाडी स्रीचा ऐकायला आलेला प्रश्न. तसं पाहिल्यास बरीचशी मंडळी ही कोरोनाचे वाढते आकडे लक्षात घेत नाहीत आणि उलट सुलट प्रश्न करतात. त्यातच ही अनाडी मंडळी.,दोन चार वर्ग शिकलेली. त्यांना थोडीफार शिकलेली माणसं जे सांगतील, तेच ते वदणार. मग कोरोना का असेना, त्यांना तो गंभीर वाटतच नाही.

आज कोरोना पुन्हा परतला आहे. तो जास्त जोर काढू लागला आहे. त्यात रुग्णांची संख्या वाढतच आहे. काही जण थोडासा सर्दी, खोकला व ताप दिसलाच तर ते तपासणीही करुन घेत आहेत. तर काहीजण संभ्रमामुळे तपासणी करीत नाहीत. त्यामुळं आकडेही बरोबर कळायला मार्ग नाही.

कोरोनाचे आजचे आकडे जर पाहिले तर आकडे बोलत आहेत. साध्या नागपूरचा आलेख जर पाहिला तर कोरोना शिगेला पोहोचल्याचे आकडे दिसत आहेत. त्यातच मृत्यूचे प्रमाणही वाढतच आहे. दि. ३१/०३/२०२० चा नागपूरच्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा हा ५८ आहे.

कोरोनाच्या मृत्यूचा आकडा पाहता बाधीत कमी व मृत्यूच जास्त अशी कोरोनाच्या पाश्वभुमीवर विचार केल्यास एकंदर परिस्थीती पाहायला मिळत आहे. दि.२३ पासून दर दिवसाला आकडे वाढतच गेले आहेत. ही झाली नागपूरची परिस्थीती. राज्यातील परिस्थीती काही अंशी बरीच वेगळी आहे. काहीजण याला राजकारण समजत आहेत. ते म्हणतात की महाराष्ट्रात सत्ता दुस-या पक्षाची आहे ना. म्हणून असे आकडे फूगत आहेत. तसेच काहीजण म्हणतात की कुंभमेळ्यात गर्दी करणे वा बंगालमध्ये निवडणूक घेतांना गर्दी होणे यानं कोरोनाचा प्रसार होत नाही काय? याबाबत सांगतांना लोकांचं म्हणणंही स्वाभावीक आहे. परंतू एक मात्र निश्चीत की हा व्हायरस अशा गोष्टीवर लक्षच देत नाही.

कोरोना व्हायरसबाबत सांगायचं झाल्यास ज्याप्रमाणे माणसाला अधिवासासाठी जे क्षेत्र चांगलं वाटते, त्या ठिकाणीच माणूस अधिवास करतो. मग त्या ठिकाणी पुरेशा सोयी असल्या तरी चालेल. जसे पुर्वीच्या काळच्या संस्कृत्या ह्या नदीकाठीच वसल्या. कारण त्या ठिकाणी पाण्याची सोय होती. तसेच नदीतून मिळणारे मासे आणि नदीबाजूतील वनात मिळणारी कंदमुळे खावून माणूस जगू लागला नव्हे तर जगला. अगदी तिच परिस्थीती कोरोना व्हायरसलाही लागू आहे. ज्या ठिकाणी त्याला पोषक वातावरण मिळतं, त्या ठिकाणी तो वाढायला लागला आहे. मग तो महाराष्ट्र का असेना, तो पाहात नाही की इथं कोणाचं सरकार आहे.

शहर असो वा राज्य, राज्य असो वा देश. कोरोना हा कोणाला ओळखत नाही. तो अमक्या पार्टीचा, तो तमक्या पार्टीचा असा भेदभाव त्याचेजवळ नाही. बस तो हे पाहतो की कोण तोंडाला रुमाल बांधून नाही. कोण काळजी घेत नाही. कोण मुजोर आहे. कोणत्या ठिकाणी जास्त खर्रे खातात. कोणत्या ठिकाणी जास्त थुंकतात. त्यातच महाराष्ट्रात खर्रे खावून थुंकणा-यांचं प्रमाण कमी नाही. म्हणूनच कोरोना वाढत चाललाय. असे खर्रे खावून थुंकणारे महाभाग. त्यांची प्रतिकारशक्ती जास्त असेलही कदाचित. पण तेच कोरोनाचे वाहक ठरतात. त्यांच्यापासूनच कोरोना वाढत चाललाय. त्यामुळं खरंच कोरोना आहे तरी काहो? हे त्यांनी म्हणण्याची गरज नाही.

आज मागासवर्गीय भागात जर कोरोनाच्या पाश्वभुमीवर घरोघरी जावून सर्वेक्षण केलं तर आकडे अाणखी फुगलेले दिसतील. कारण त्यांना भीती आहे की जर कोरोना आढळलाच तर आपण इलाजच करु शकणार नाही. ते मरणं पसंद करतात. पण कोरोना तपासणी करुन घेत नाहीत. त्यातच समजा एखाद्या वेळी प्रकृती खालावलीच तर ते दवाखान्यातही न जाता केवळ गावठी इलाज करतात. काढे बनवतात व त्यातून सुधारतात.

महत्वपूर्ण गोष्ट अशी की जे आकडे आज बोलत आहेत. ते आकडे ज्या भागात सुशिक्षीत लोक राहतात. त्या भागातील आकडे बोलत आहेत. परंतू ज्या भागात झोपडपट्ट्या व मागासलेला भाग आहे. त्या भागातील आकडे बोलत नाहीत. म्हणून कोरोना कुठे जास्त आहे आणि कुठे कमी हे कळत आहे.

आज संपूर्ण देशातील राज्याची परिस्थीती पाहता केरळ व महाराष्ट्र हे जास्त सुशिक्षीत व पुढारलेली राज्ये आहेत. त्या भागात आकडे हे बोलणारच. कारण सुशिक्षीतपणा. ही सुशिक्षीत मंडळी नीट कोरोनाची तपासणी करुन घेत असल्यानं आकडे दिसत आहेत. बाकी राज्यात अशी परिस्थीती नसेल. यात राजकारण नाही. खरंच कोरोना आहे. त्यामुळे कोणीही बिनधास्त वागण्याची गरज नाही.

एकट्या महाराष्ट्राची परिस्थीती पाहता, परिस्थीती फारच गंभीर आहे. अशीच परिस्थीती इतरही राज्यात आहे. कारण आमची गैरवर्तणूक………आमची जर गैरवर्तणूक अशीच असली तर तो काळ जास्त दूर नाही की ज्या दिवशी संपूर्ण देशच नाही तर जगही नष्ट झालेलं दिसेल. कारण पुढे परिस्थीती फारच गंभीर येणार आहे. आज जे आकडे आपल्याला दिसत आहेत. ते आकडे बोलणारे जरी असले तरी त्याची गंभीरता आपल्याला जाणवत नाही. कारण आपल्या घरी कोरोना नाही ना. कोरोना बाजूच्या घरी आहे. आज राज्यातील परिस्थीती गंभीर असूनही राज्यात गल्लीगल्लीत धुमधडाक्यात जास्त संख्येनं विवाह सोहळे होत आहेत. पार्ट्या होत आहेत. कुणाचे वाढदिवस होत आहेत. आलिशान मंडप टाकले जात आहेत. मिळवणूकाही निघत आहेत. निव्वळ गर्दीचं वातावरण. काय करतो कोरोना म्हणत सगळेच गर्दी करतात. कोरोना वाढणार नाहीतर काय,

विशेषतः सांगायचं झाल्यास जे आकडे आज दिसतात ना, ते आकडे हे अजूनही खरे नाहीत. हे स्वतःहून तपासणी करुन घेणा-यांचे आकडे आहेत. जर गल्लीगल्लीत तपासणी झालीच तर आकडे कितीतरी पटीनं वाढू शकतात. पण आपल्याला कोणती गरज आहे तपासणी करुन घ्यायची असं वागत शहर पालिकाही त्यावर कानाडोळा करीत आहेत. तसेच लोकं दहशतीत असल्यानं ते असं मरण पसंत करतात. पण कोरोनाची तपासणी करुन कोरोना आहे असं सिद्ध झाल्यास कोरोनाच्या दहशतीनं मरणं पसंत करीत नाहीत. म्हणून आजूबाजूला अशा तपासण्या न केल्यानं कोरोना दिसत नसल्यानं सामान्य माणसांना खरंच कोरोना आहे तरी काहो? असे प्रश्न पडत आहेत. तसेच ते कोरोनाला न घाबरुन बिनधास्त फिरत आहेत. गर्दी करीत आहेत. तसेच कोरोनाचे वाहक बनून कोरोना वाढवीत आहेत. जरी कोरोनाबाबत जनजागृती झाली असली तरी…….

कोरोना संपू शकतो. पराभूत होवू शकतो. आपण आपल्या मनात ठाणलं तर. पण मला काय असे म्हणत आम्ही जे बिनधास्त वावरतो ना. ते आमचे वावरणे बरे नसले तरी आम्हाला ते समजत नाही.  त्यामुळं कोरोना संपायचं नावच घेत नाही आणि त्यातच हे निव्वळ राजकारण आहे असं म्हणण्याची नाही तर मानण्याची पाळी येते.

कोरोनाबाबतीत सांगायचं झाल्यास आज रुग्णालयात बेड शिल्लक नाहीत. खाजगी रुग्णालयेही हाऊसफुल आहेत. तरीही लोकं केवळ याला राजकारण मानतात. तरीही लोकं खरंच कोरोना आहे तरी काहो म्हणतात. ही गोष्ट आश्चर्य करणारी आहे. त्यामुळं आम्ही याबाबतीत किती मागे आहो असं वाटतं व आमच्या सुशिक्षीतपणाची किवही येते. त्यातच कोरोनाचे आकडे फुगत असले तरी आम्हाला त्याची काही चिंता नाही. आम्ही चिंता करीत नाही. त्यामुळं आम्हाला अभय प्राप्त झालं आहे. पण लक्षात ठेवा हेच आमचं अभयपण उद्या आमचाच जीव घ्यायला मागंपुढं पाहणार नाही. त्यासाठी तो दिवस काही जास्त दूर नाही. ज्या दिवशी कोरोनाच्या यादीत आमच्या घरचा जीव दिसेल. आम्हीही दिसू. म्हणूनच आजपासूनच कोरोना बाबतीत काळजी घेतलेली बरी. निदान आपल्या शेजा-यांपर्यंत आपल्या घरापर्यंत कोरोनाला यायला जागाच मिळणार नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

ग्लोबल न्युज नेटवर्क: