अतुल भातखळकरांचे डोकं ठिकाणावर आहे का ; शिवसेना नेत्या कडाडल्या

मुंबई : परप्रांतीयांच्या नोंदणीच्या मुद्द्यावरुन भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी समता नगर पोलीस स्टेशनमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार केली आहे. भातखळकरांच्या तक्रारीवर शिवसेनेकडून पलटवार करण्यात आला आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि आमदार मनीषा कायंदे यांनी भातखळकरांचे डोकं ठिकाणावर नसल्याचे विधान केलं आहे. भातखळकर उद्या कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही तक्रार करतील असे टीकास्त्र मनीषा कायंदे यांनी अतुल भातखळकर यांच्यावर डागलं आहे. केंद्र सरकारनेच सर्व राज्यांना कामागारांची नोंदणी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. महिला सुरक्षा लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला असल्याचे मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे.

 

सामाजिक तेढ पसरवण्याचा आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांच्या विरोधात भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी तक्रार दाखल केली आहे.मंत्रिमंडळात आपल्या मांडीला मांडी लावून बसणारे धनंजय मुंडे, आपल्या पक्षाचे नेते संजय राठोड हे परप्रांतीय आहेत का? असा माझा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे. सामाजिक तेढ पसरवल्याबद्दल मी आज मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, अशी माहिती ट्विटच्या माध्यमातून भातखळकर यांनी दिली. यावर शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी संताप व्यक्त करत भातखळकरांना खडेबोल सुनावले आहे .

अतुल भातखळकर यांचे डोकं ठिकाणावर नाही. एखादा व्यक्ती कुठून आला, त्याची नोंद नसावी का? पोलिसांना तपास करावा लागतो. पोलिसांना गुन्हेगाराची पार्श्वभूमीची नोंद घ्यावी लागते. यात मुख्यमंत्री काय चुकीचे बोलले? बाळासाहेब ठाकरे यांनी हीच भूमिका कित्येक वर्षांपूर्वी मांडली असल्याचे म्हणत कायंदे यांनी भातखळकरांवर पलटवार केला .

इतकेच नाही तर केंद्र सरकारनेही अशाच प्रकारच्या सूचना अनेक राज्यांना दिल्या आहेत . कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात सरकारही याच सूचनांचे पालन करत आहे . आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातही याच सूचनांचे पालन करीत असल्याने भाजपच्या पोटात दुखत असल्याचे कायंदे म्हणाल्या . भाजपवाले हताश होऊन ठाकरे सरकारवर हे आरोप करीत आहेत . याला उत्तर देणे म्हणजे वेळ घालवण्याचा प्रकार असेही कायंदे म्हणाल्या .

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: