‘गांधींना मारण्यापेक्षा बॅ. जीनांवर हा प्रयोग झाला असता तर…’, सामना अग्रलेखातून संजय राऊतांचा भाजपाला टोला

 

शिवसेना खासदार संजय राऊत हे नेहमीच सामना अग्रलेखातून आपली रोखठोक भूमिका मांडत असतात. त्यात आता पंतप्रधान मोदी यांनी फाळणी स्मुर्ती दिन साजरा करण्याच्या मुद्द्यावरून मोदींना टोला लगावला आहे. पाकिस्तानच्या निर्मितीचे गुन्हेगार हे फक्त महात्मा गांधींना ठरवून नथुराम गोडसेंनी गांधींवर गोळ्या झाडल्या. गांधींना मारण्यापेक्षा बॅ.जीनांवर हा प्रयोग झाला असता तर फाळणीचा स्मृतीदिन साजरा करण्याची वेळ आली नसती, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आजच्या ‘सामना’त म्हटलं आहे.

भारताची फाळणी हा एक भयपट होता. फाळणीच्या वेळी दोन्ही देशांच्या सीमेवरील प्रांतांमध्ये झालेल्या अमानुष हिंसेने स्वातंत्र्याचा पहिला दिवस रक्ताने भिजला होता. पंडित नेहरू स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाची जुळवाजुळव करीत बसले होते. सोबत इंदिरा गांधी होत्या. इतक्यात बाजूच्या खोलीतला पह्न वाजला. नेहरु आत गेले. ते फोनवर बोलू लागले, पण समोरून नीट ऐकू येत नव्हते. नेहरू वारंवार समोरच्या व्यक्तीस सांगत होते, ‘पुन्हा सांग! पुन्हा सांग!’ नेहरूंनी पह्न ठेवला व काळवंडलेल्या चेहऱ्याने ते खुर्चीवर येऊन बसले. इंदिराजींनी विचारले, “काय झाले? कुणाचा फोन होता?”

“लाहोरचा फोन होता.” नेहरुंना सांगताना हुंदका फुटला. ते म्हणाले, “लाहोरच्या हिंदी वसाहतीमधील पाणी पुरविणाऱ्या सर्व लाइन्स दंगलखोरांनी तोडल्या आहेत. सकाळपासून तेथील लहान मुले, आबालवृद्ध पाण्यासाठी वणवण करीत आहेत. हे काय चाललंय? मी रात्री देशवासीयांना भाषणात काय सांगू? त्यांना कसे तोंड दाखवू?”…फाळणीचे कोणतेही नियोजन नव्हते. कायदा-सुव्यवस्था, माणुसकी रस्त्यारस्त्यावर मुडद्याप्रमाणे पडली होती.

या हिंसाचारात १० लाख लोक मारले गेले. हजारो महिलांनी आपली इज्जत वाचविण्यासाठी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. तर अनेक घरांत आपल्या बायका-मुली-सुनांना स्वत:च मारले, नराधमांच्या हाती लागून त्या महिलांचे जीवन खराब होऊ नये म्हणून… सीमावर्ती भागातील रेल्वे स्थानकांवर फक्त अविश्वासाचेच वातावरण होते. ‘हिंदू पाणी, हिंदू चहा’ आणि ‘मुसलमान पाणी, मुसलमान चहा’ वेगवेगळ्या स्टॉलवर विकले जात होते. या सर्व फाळणीच्या आठवणी जागवायच्या की विसरायच्या? पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेय, ‘फाळणी विसरू नका’, असं संजय राऊत यांनी ‘रोखठोक’मध्ये म्हटलं आहे.

Team Global News Marathi: