बीडमध्ये शिवसेना पदधिकाऱ्यासह ३३ जणांविरोधात गुन्हा दाखल
ग्लोबल न्यूज: शिवसेना किसान सेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांच्यावर घरात घुसून काही समाजकंठकांनी हल्ला केला आहे. यावेळी खिडक्यांसह घरातील वस्तूंची तोडफोड केली आहे. वाहनाची तोडफोडही करण्यात आली. ही घटना शहरातील स्वराज्यनगरात गुरुवारी रात्री दहा वाजता घडली. याप्रकरणी ३३ जणांवर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परमेश्वर सातपुते हे स्वराज्यनगरात वास्तव्यास आहेत. गुरुवारी रात्री ते कुटुंबासमवेत घरी होते. यावेळी दादासाहेब खिंडकर, समाधान खिंडकर, बाबूराव खिंडकर, मच्छिंद्र चव्हाण, अविनाश पाटोळे, ज्योतिराम भटे, महादेव मातकर, मोतीराम मातकर, शहादेव मातकर, कुंडलिक भटे, बाबा सातपुते, लक्ष्मण सातपुते, शंकर कदम व इतर २० ते २५ जणांचा जमाव घरासमोर आला.
त्यांनी तलवार, लोखंडी गज, कोयते व लाठ्या-काठ्या व दगडांनी हल्ला केला. भीतीपोटी सातपुते हे कुटुंबासह वरच्या मजल्यावर गेले व दरवाजा आतून बंद केला. यादरम्यान त्याच्या घरात घुसून रोख एक लाख व दोन तोळे सोने लंपास केल्याचे परमेश्वर सातपुते यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी ३३ जणांवर दरोडा, जिवे मारण्याचा प्रयत्न केल्यावरून गुन्हा दाखल झाला आहे.