सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात 15 जूनपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंदच राहणार

सोलापूर : शहरातील कोरोनाचा (Covid-19) संसर्ग कमी झाला असून रूग्णसंख्या 50 पेक्षा कमी झाली आहे. ग्रामीण भागातील रूग्णसंख्या अजूनही कमी झालेली नसून मृत्यूदरही चिंताजनक आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागातील कडक लॉकडाउन (Lockdown) 15 जूनपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. तर शहरातील दुकानांचा निर्णय महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर (Solapur Municipal Corporation Commissioner P. Shivshankar) यांनी शहरातील दुकानांचा निर्णय अजून घेतला नसून रात्री उशिरा निर्णय होऊ शकतो. आज दुकाने सुरू करण्यास परवानगी देता येईल का, यासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्‍त, महापालिका आयुक्‍तांची बैठक पार पडली. (Strict lockdown in Solapur rural but no decision of the city)


कोरोनाची दुसरी लाट अजूनही अपेक्षेप्रमाणे कमी झालेली नाही. दरम्यान, ज्या शहर-जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटिव्हर दर 10 टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे, त्याठिकाणची दुकाने सुरू करण्यासंदर्भात निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र, सोलापूर शहर व ग्रामीण भागातील दुसऱ्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आता ज्या पध्दतीने अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने सुरू असून काही दुकानांची वेळ सकाळी सात ते अकरापर्यंत करण्यात आली आहे. त्या दुकानांची वेळ तशीच ठेवावी, अशी मागणी बैठकीत काही अधिकाऱ्यांनी केली. तर दुकाने सुरू करण्यापूर्वी व्यापाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी, अशीही चर्चा झाली.

मात्र, कोरोनाची लाट आटोक्‍यात येत असतानाच रिस्क घेणे परवडणारे नाही. परंतु, दुकानदार व व्यावसायिकांच्या मागणीचाही विचार करावा लागणार आहे. त्यामुळे दुकाने सुरू करण्याचा निर्णय सर्वांशी बोलून घेतला जाईल, असे महापालिका आयुक्‍तांनी बैठकीत स्पष्ट केले. तर उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्‍कलकोट, मोहोळ या तालुक्‍याचा मृत्यूदर सर्वाधिक असून पंढरपूर, बार्शी, माळशिरस, माढा, करमाळा या तालुक्‍यात रूग्णवाढ मोठी आहे.

त्यामुळे ग्रामीण भागातील कडक लॉकडाउन उठविला जाणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. ग्रामीण भागातील कडक लॉकडाउन पुढील 15 दिवस तसाच ठेवला जाणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी सांगितले. त्यासंबंधीचा सविस्तर आदेश काढला जाणार आहे. दरम्यान, शेतीशी निगडीत दुकानांना परवानगी दिली जाणार आहे. तर पावसाळा सुरू होत असल्याने त्यासंबंधीत दुकानांनाही सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत परवानगी देण्यासंबंधी सकारात्मक चर्चा बैठकीत झाल्याचे सांगण्यात आले.

 

सर्वांशी चर्चा करून शहरातील दुकानांचा निर्णय

शहरातील व्यापारी, उद्योजकांनी व व्यापारी संघटनांनी स्थानिक लोकप्रतिनिधींसह महापौर श्रीकांचना यन्नम, महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदने दिली आहेत. पहिल्या व दुसऱ्या कडक लॉकडाउनमुळे अडचणीत आलेला व्यवसाय सुरळित होण्यासाठी शासनाच्या निर्देशाप्रमाणे सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सर्वच दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. शहरातील रूग्णसंख्या व मृतांचे प्रमाणही कमी झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर त्यासंदर्भात काही लोकप्रतिनिधींनी आयुक्‍तांशी चर्चाही केली आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्वांशी बोलून शहरातील दुकानांसंबंधी निर्णय घेऊन आदेश काढू, असे महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी “सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले. आता महापालिका आयुक्‍तांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या सेवा सुरू होणार ?

जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये 15 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू ठेवण्यास परवानगी देण्याची शक्यता आहे. सोमवार ते शुकवार या कालावधीत सकाळी 7 ते 11 या वेळेत सर्व अत्यावश्यक सेवा दुकाने सुरू राहणार आहेत असेही सांगितले जाते. कृषी पूरक व्यवसाय आणि कृषी संबंधीत सेवा सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. शहरातील सर्व बँका कामाचे सर्व दिवस सुरू राहतील. निर्धारित वेळेत हॉटेल्स, बार यांना फक्त पार्सल सेवेची परवानगी दिली आहे.

काय बंद राहणार?

दुपारी नंतर ३ अत्यावश्यक सेवा वगळता इतर कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई घालण्यात आली आहे. हॉटेल,जिम पुन्हा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो. रेस्टॉरंट आणि बार फक्त पार्सल/ घरपोच सेवेसाठी सुरू राहतील असेही सांगितले जाते. मॉल्स, केश कर्तनालये बंदच राहणार आहेत.

दरम्यान, या आदेशांचं पालन न केल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. नियम मोडल्यास 500 ते 5 हजार रुपये पर्यंत दंड आकारला जाणार आहे. मागील 15 दिवस जिल्ह्यातील सर्व दुकाने कडकडीत बंद होती, त्यामुळे सर्ग बाजूने मेटाकुटीला आलेल्या सर्व सामान्य नागरिकांना, व्यापाऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: