कर्जतमध्ये पुन्हा एकदा राम शिंदे आणि रोहित पवारांमध्ये सामना!

 

नगर | नगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतीसाठी दोन दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार तर दुसरीकडे भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे असा असा सामना रंगणार आहे. २१ डिसेंबर रोजी कर्जत नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. कर्जत नगरपंचायतीवर सध्या भाजपची एक हाती सत्ता आहे. ही सत्ता राखण्यासाठी शिंदेंनी सर्व शक्ती पणाला लावली आहे तर रोहित पवार यांनी भाजपचा पराभवाची धूळ चारण्यासाठी रणनिती आखल्याचं पाहायला मिळत आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव करुन मोठा धक्का देत भाजपच्या बालेकिल्लात प्रवेश केला. मात्र, आता रोहित पवारांची खरी कसोटी नगरपंचायतीच्या निवडणुकीत लागणार आहे. रोहित पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल. तर शिंदे यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते सर्व ताकद लावून कामाला लागले आहेत.

दरम्यान, या निवडणुकीत विजय आमचाच होणार, नगर पंचायतीच्या 17 पैकी 17 जागा आम्हीच जिंकणार, असा दावा रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. तसंच राजकिय हित आणि राजकारण करणाऱ्या लोकांच्या मागे लोक कधीही उभे राहत नाहीत, असा टोलाही त्यांनी शिंदे यांना लगावला आहे. आता या टीकेला राम शिंदे काय प्रतिउत्तर देतायत हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: