“भाजपामध्ये सगळे हरिश्चंद्राचे अवतार आहेत का?”

 

 

 

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील निवासस्थानांवर ईडीनं छापे टाकल्यानंतर त्यांना चौकशीसाठी समन्स देखील बजावले आहेत. या चौकशीसाठी अद्याप अनिल देशमुख उपस्थित राहिले नसले, तरी त्यावरून आता विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना घेरायला सुरुवात केली आहे.

 

मात्र याच मुद्द्यावरून सत्ताधारी महाविकासआघाडीला विरोधकांनी लक्ष्य केलं आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून भाजपाला खोचक सवाल केला आहे. “अनिल देशमुख यांची एक बाजू आहे. ती समजून घ्यायला हवी. भाजपाच्या लोकांवर कधी असे आरोप झाले नाहीत का? सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत का? ते सगळे हरिश्चंद्राचे अवतार आहेत का? बाकी सगळे हरामखोर आहेत का?” अशी प्रश्नांची सरबत्ती संजय राऊत यांनी भाजपावर केली.

 

एकीकडे अनिल देशमुख यांना ईडीनं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. तर दुसरीकडे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी उद्वव ठाकरेंना पत्र लिहून भाजपाशी पुन्हा जुळवून घेण्याचे आव्हान केले आहे. या दोन मुद्द्यांवरून भाजपाकडून सातत्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकासआघाडी सरकारला लक्ष्य केलं जात आहे. त्यावर संजय राऊतांनी आज पत्रकारांशी बोलताना निशाणा साधला.

Team Global News Marathi: