बीडमध्ये भाजपाला जोरदार धक्का, आता पर्यंत ७४ पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे |

 

बीड | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातून चार जणांना संधी देण्यात आलेली आहे. मात्र दुसरीकडे हे चारही जण इतर पक्षातून भाजपच्या गोटात सामील झालेले आहेत. त्यामुळे निष्ठावंतांना डावलून इरांना संधी देण्यात आल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यातच खासदार प्रीतम मुंडे यांना सुद्धा डावलण्यात आल्यामुळे बीडमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचे सत्र सुरु केले आहे.

रविवारी पंकजा मुंडे भाजपच्या राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी येथे आल्यावर त्या केंद्रीय नेतृत्वापुढे प्रीतम मुंडेबद्दलची आपली बाजू मांडतील, असे म्हटले जात होते. तथापि, त्यांनी आधीच स्पष्ट केले होते की, बहिणीला मंत्रीपद न मिळाल्यामुळे ती आणि तिचा परिवार नाराज नाही.

पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, आम्ही कधीही मंत्रीपदाची मागणी केली नव्हती. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यसभा सदस्य भागवत कराड यांचा समावेश झाल्यामुळेही मुंडे समर्थक नाराज आहेत, असे म्हटले जाते. पहिल्यांदा खासदार झालेले कराड यांना बळ दिल्यास मराठवाड्यात मुंडे यांचा प्रभाव कमी केला जाऊ शकेल, अशा नजरेतून पाहिले जात आहे.

प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये डावलण्यात आल्यानंतर, बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरुच आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे आत्तापर्यंत ७४ राजीनामे सुपूर्द करण्यात आले आहेत. केज पंचायत समितीच्या सभापतीसह ३ सदस्यांनी जिल्हाध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला आहे. तसेच येणाऱ्या दिवसांत आणखी पदाधिकारी आपला राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.

Team Global News Marathi: