कुठल्याही परिस्थितीत औरंगाबादचे संभाजीनगर होणारच – मंत्री अब्दुल सत्तार
महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने व राष्ट्रवादी काँग्रेसने नामांतराला विरोध असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाल्याचे दिसून आले. नामांतराबाबत भाजपसह मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतली होती. शिवसेना पक्षाने संभाजीनगर असे नामकरण करून हिंदुत्व सिद्ध करावे असे आवाहन देण्यात आले.
तर, दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या ट्विटर अकाउंटद्वारे शासन निर्णय वा इतर माहिती देताना औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आगपाखड केली होती. तसेच राष्ट्रवादीने सुद्धा यावर ताशोरे ओढले होते.
दरम्यान, औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर होणारच, शिवसेनेमध्ये शिवसेनाप्रमुखांचा आदेश हा अंतिम असतो. बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर यापुर्वीच केले आहे. त्यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिक्कामोर्तब करतील. त्यामुळे यात आता कुणालाही वाटा किवा फाटा मारता येणार नाही. काॅंग्रेसचा या नामांतरला विरोध असला तरी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असा दावा राज्याचे महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे.