आपल्याला शिवसेनेसोबत कायम राहायचेय, जुळवून घ्या; राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात अजितदादांच्या सूचना

आपल्याला शिवसेनेसोबत कायम राहायचेय, जुळवून घ्या; राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात अजितदादांच्या सूचना

आपल्याला शिवसेनेसोबत कायम राहायचे आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर खटके उडत असले तरी शिवसेनेसोबत जुळवून घ्या, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कार्यकर्त्यांना दिले.

विधानसभा व लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बोलावण्यात आली होती. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱयांना मार्गदर्शन केले. या बैठकीत त्यांनी शिवसेनेसोबत कायम राहण्याचे व जुळवून घेण्याचे निर्देश दिले.

 

त्यापूर्वी पराभूत उमेदवारांना मिळालेली मते, त्यांचे मतदारसंघातील प्राबल्य, मतदारसंघात कमी मतदान मिळालेल्या भागाची स्थिती आणि पराभवाची कारणे यावर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. राज्यातील आगामी ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीतही चर्चा झाली.

 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने अनेकांना आपण पक्षात अडगळीत फेकल्यासारखी भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे बरेच पदाधिकारी नाराज आहेत. निवडणुकीत पराभूत उमेदवारांना बळ देण्याचा आणि त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आला. आगामी निवडणुकांमधील या उमेदवारांची जबाबदारी व त्यांच्यावर सोपवण्यात येणारी जबाबदारी या विषयावर चर्चा झाली.

 

लवकरच महामंडळाचे वाटप

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महामंडळाचे वाटप कधी होणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. त्याचा धागा पकडत लवकरच महामंडळ वाटप करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.

 

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, प्रवक्ते व अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आदी उपस्थित होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: