मुंडेंनी दोन दिवसात राजीनामा न दिल्यास भाजपा उचलणार हे पाऊल
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या आरोपावरून आता राज्यातील राजकारण तापू लागले आहे. भारतीय जनता पक्षाने हा मुद्दा उचलून धरत मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. मुंडे यांनी या प्रकरणी स्वत: कबुली जबाब दिला असून हे कृत्य लोकशाही संकेत, नैतिकता आणि कायद्याच्या चौकटीत बसत नाही.
त्यांनी पश्चाताप म्हणून स्वत:हून मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, त्यांनी जर राजीनामा दिला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा असे सांगताना मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास राज्यभर आंदोलन करणार असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी बोलत होते. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत त्यांनी राजीनामा द्यायची गरज नाही असे विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. त्यांच्या विधानाचाही भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी समाचार घेतला. चंद्रकांत पाटील यांनी ‘धनंजय मुंडे यांनी स्वतहून काही गोष्टी कबूल केल्या आहेत.
लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या @dhananjay_munde यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ! @OfficeofUT @PawarSpeaks pic.twitter.com/PVrlONAoBb
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 13, 2021
त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते चुकीच्या गोष्टींचे समर्थन करत असतील तर जनता त्यांना माफ करणार नाही’ अशा शब्दांत जयंत पाटील यांना टोला लगाविला. मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाला चुकीची माहिती दिली. यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते, असेही पाटील म्हणाले. या अगोदर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान दोन लग्नांचे सत्य मुंडे यांनी लपवून ठेवल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाला केली आहे.